संजय राऊत यांनी महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस सरकार हे स्मशानात पोहचलं आहे अशी टीका केली आहे. या सरकारचे डोळे बंद आहेत, कान बंद आहेत सगळंच बंद आहे. त्यांनी निर्णय लकवा हा विषय घेऊन त्यावर बोलू नये असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. त्यानंतर आता नितेश राणे यांनी मी WHO ला पत्र लिहिणार आहे आणि संजय राजाराम राऊत यांच्या जीभेचं संशोधन करायला सांगणार आहे असं म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे नितेश राणे यांनी?
“WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेला मी पत्र पाठवणार आहे की त्यांनी संजय राऊत यांच्या जिभेचं संशोधन करावं असं मी त्यांना सांगणार आहे. एखादा व्यक्ती चोवीस तास चाटुगिरी कशी करु शकतो? यासाठी संजय राऊतांच्या जीभेला दाद दिली पाहिजे. याबद्दल WHO ने संजय राऊतांच्या जिभेचं संशोधन करावं आणि देशाला सांगावं की अशी जीभ परत होऊ शकत नाही. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या चाटुगिरीचा जो उच्चांक संजय राऊतांनी गाठला आहे. त्यासाठी खरंच त्यांच्या जिभेचं संशोधन झालं पाहिजे. आज राहुल गांधींना सचिन तेंडुलकर, विराट कोहलीची उपमा दिली. मी त्यांना सांगू इच्छितो की राहुल गांधींची सचिन आणि विराटसह तुलना करण्याआधी या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटच्या माध्यमातून भारताची प्रतिमा उंचावली आहे. राहुल गांधी काही दिवसापासून अमेरिकेत जाऊन आमच्या भारत देशाची, हिंदू धर्माची बदनामी करत आहेत. संजय राऊतांना ते भांडुपमध्ये बसून समजतंय का?” असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला आहे.
आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात गेल्यानंतर भारतमाता की जय या घोषणा ऐकू येतात. राहुल गांधी अमेरिकेला गेल्यावर खलिस्तान जिंदाबादचे नारे ऐकायला मिळाले. आपल्या राष्ट्रगीताबद्दल मोदीजी जेव्हा जातात तेव्हा वेगळा अभिमान ऐकायला, पाहण्याला मिळतो. राहुल गांधींच्या कार्यक्रमात भारताचं राष्ट्रगीत सुरु असताना समोरचे लोक उभेही राहिले नाहीत.
राहुल गांधी म्हणतात मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ. त्यांच्या या मोहब्बतच्या दुकानात हिंदूंना जागा नाही. कर्नाटकमध्ये हिंदूंची काय अवस्था झाली आहे जरा बघा. राहुल गांधींच्या या दुकानात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा होतात, हिरवे झेंडे फडकवले जातात. अशीही टीका नितेश राणेंनी म्हटलं आहे. या सगळ्यालाच ते मोहब्बत की दुकान म्हणतात का? असाही प्रश्न नितेश राणेंनी विचारला आहे.