अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रामाच्या मंदिरात आता दर्शनही सुरु झालं आहे. अयोध्येत पार पडलेल्या सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती होती. अशात IAS अधिकारी मनिषा म्हैसकर यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
मनिषा म्हैसकर यांनी त्यांच्या आयएएस प्रशिक्षणाच्या दरम्यान घडलेल्या घटनेचा किस्सा सांगितला आहे. मसुरी या ठिकाणी ट्रेनिंग दरम्यान एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीचा उल्लेख करत मनिषा म्हैसकर यांनी एक पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. या बैठकीत पेढा खाल्ल्याची आठवणही त्यांनी सांगितली आहे.
काय आहे मनिषा म्हैसकर यांची पोस्ट?
जय श्री राम
आयुष्याचं वर्तुळ पूर्ण होतं आणि … तेही कसं!
६ डिसेंबर १९९२ हा मसुरीतला खूप जास्त थंडी असलेला दिवस होता. १९९२ ची आयएएस बॅच त्यांच्या फाउंडेशन कोर्समध्ये होती. अयोध्येतील रामजन्मभूमीवरील महत्त्वाच्या घडामोडींच्या बातम्या हळूहळू पसरत होत्या. त्यावेळी एक अतिशय उत्स्फूर्त बैठक आयोजित करण्यात आली होती, परंतू अत्यंत विचारपूर्वक, केवळ निमंत्रितांसाठी ही बैठक होती. माझी नागपूरशी घट्ट जोडली गेलेली नाळ निमंत्रण म्हणून पुरेशी मानली गेली. बैठकीच्या ठिकाणी काही जण ‘जय श्री राम’चा जयघोष करत होते, पेढे वाटले जात होते… मला एक केसर पेढा खाल्ल्याचे आठवते आणि त्या क्षणी ६ डिसेंबर १९९२ च्या अत्यंत थंड रात्री मला माहित होते की अयोध्येतली ही घडामोड कशाची तरी सुरुवात होती. खूप सकारात्मक, खूप शक्तिशाली, खूप शुभ सुरूवात.
पेढा खाल्ल्याची बातमी फुटली आणि..
या गोष्टी नेहमी होतात तशा पेढे वाटून खाल्ल्याची बातमी फुटली आणि त्यातून खळबळ उडाली. नोटिसा बजावण्यात आल्या, जातीयवादी घटक IAS मध्ये घुसखोरी करत आहेत, असे सांगण्यात आले. एका मोठ्या दैनिकाच्या पहिल्या पानावर ही घटना छापून आली… १९९२ च्या बॅचला निराशाजनक ठरवण्यात आलं, ज्यात प्रामुख्याने लहान शहरातील लोक होते – पॉश, स्मार्ट शहरातल्या मुलांना काय झालंय? धर्मनिरपेक्षता कुठे गेली? असे प्रश्न विचारण्यात आले.
आयुष्य पुढे जात राहिलं पण विश्वास दृढ होता – ६ डिसेंबर १९९२ च्या रात्री गुपचूप खाल्लेला पेढा ही काहीतरी शक्तिशाली, काहीतरी सकारात्मक, काहीतरी शुभ अशी सुरुवात होती. २२ जानेवारी २०२४ अयोध्येतील राम लल्ला प्राणप्रतिष्ठा आणि प्रत्येकाला उत्सवात सामील होण्यासाठी राष्ट्रीय सुट्टीची घोषणा करून उजाडेल. अशी पोस्ट मनिषा म्हैसकर यांनी २१ जानेवारी रोजी केली होती. जी चांगलीच चर्चेत आहे.