IAS Pooja Khedkar Wealth : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची जोरदार चर्चा होत आहे. २०२३ च्या बॅचच्या IAS अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांची प्रशिक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती केल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दालन काबीज केले. तसेच खासगी ऑडी वाहनावर लाल दिवा लावला. त्यामुळे त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली आहे. आज त्या वाशिम येथे रुजू झाल्या. सोशल मीडियावरही त्या चर्चेचा विषय ठरत आहते. तसेच युपीएससी परीक्षेदरम्यान त्यांनी दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. या मुलाखतीदरम्यान त्यांनी केलेले दावे खोटे असल्याचे अनेक लोक सांगत आहेत. तसेच त्यांची ओबीसी नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता (मल्टिपल डिसॅबिलिटी) या दोन प्रकारांतून त्यांची निवड झाल्याचे शासनाच्या संकेतस्थळावर दिसून येत आहे. यावरही जोरदार टीका होत आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याबाबतची माहिती एक्सवर पोस्ट केली आहे. तसेच पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमिलेयर प्रवर्गातून परीक्षेत यश मिळविल्याबद्दलही कुंभार यांनी टीका करत कागदपत्रे समोर आणली आहेत.
हे ही वाचा >> आयएएस’ अधिकारी की नववतनदारी?
पूजा खेडकर यांची संपत्ती किती?
- IAS पूजा खेडकर यांच्याकडे ११० एकर शेतजमीन असल्याचे समोर आले आहे.
- तसेच सहा प्लॉट्स आणि ७ फ्लॅट आहेत.
- ९०० ग्रॅम सोनं आणि हिरे आहेत.
- त्यांच्याकडे १७ लाख रुपयांचे सोन्याचे घड्याळ आहे.
- ऑडीसह चार आलिशान गाड्या आहेत. तसेच दोन खासगी कंपन्यात त्यांची भागीदारी आहे.
- त्यांच्याकडे एकूण १७ कोटींची मालमत्ता आहे.
हे ही वाचा >> IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
कुटुंबाची संपत्ती किती?
नॉन क्रिमिलेयरसाठी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे. मात्र, खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता ४० कोटींहून अधिक असल्याचे दाखवले आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली. त्यामुळे खेडकर यांच्या नॉन क्रिमिलेयरसाठीच्या पात्रतेबाबतही प्रश्नचिन्ह आहे. वडील दिलीप खेडकर यांच्याशिवाय पूजा खडेकर यांच्याकडेही कोट्यवधीची संपत्ती असल्याचे समोर आले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने मागितला अहवाल
पूजा खेडकर यांच्यसंदर्भात समोर आलेल्या गोष्टी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांचं गैरवर्तन या पार्श्वभूमीवर त्यांची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचलं असून बुधवारी थेट पंतप्रधान कार्यालयानं पूजा खेडकर यांच्यासंदर्भातला अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर यांच्यावर दिल्लीतूनही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पूजा खेडकर यांनी वाशिम जिल्ह्यात कार्यभार स्वीकारला
पूणे जिल्ह्यातून बदली झाल्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. आज त्यांनी वाशिम जिल्ह्याधकारी कार्यालयात कार्यभार स्वीकारला.