UPSC files FIR against Puja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियमबाह्य पद्धतीने वागल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची चौकशी सुरू केली होती. याआधी त्यांनी ओबीसी नॉनक्रिमिलेयर आणि अंशतः अंपगत्वाचे बोगस प्रमाणपत्र वापरल्याचा आरोप झाला होता. आता यूपीएससीने चौकशी केल्यानंतर एक पत्रक जाहीर केले आहे. त्यात अनेक गंभीर आरोप असल्याचे समोर आले आहे. तसेच या आरोपानंतर तुमची नागरी सेवा परीक्षा – २०२२ ची उमेदवारी का रद्द करू नये? अशी कारणे दाखवा नोटीसही केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिली आहे. पूजा खेडकर यांनी आपला फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाइल नंबर, स्वतःचे आणि आई-वडिलांचे नाव बदलून नियमापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने कोणते आरोप केले?
पूजा खेडकर यांनी आपली ओळख बदलून नियमापेक्षा अधिकवेळा परीक्षा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे करण्यासाठी त्यांनी स्वतःचा फोटो, स्वाक्षरी, नाव, आई-वडिलांचे नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि पत्ता बदलला. यूपीएससीची परीक्षा किती वेळा द्यावी, याचे प्रत्येक प्रवर्गाचे नियम ठरलेले आहेत. परीक्षा देण्याची मर्यादा संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला पुन्हा यूपीएससीची परीक्षा देता येत नाही. मात्र पूजा खेडकर यांनी ओळख बदलून परीक्षा दिली.
हे वाचा >> पूजा खेडकरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; आई मनोरमा यांच्याबद्दल म्हणाल्या…
यूपीएससीकडून सखोल चौकशी
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांच्या प्रकरणाचा सखोल तपास केला. नागरी सेवा परीक्षा – २०२२ मधून पूजा खेडकर यांची निवड झाली होती. या तपासातून समोर आले की, पूजा खेडकर यांनी नावे बदलून अनेकवेळा यूपीएससीची परीक्षा दिली. प्रत्येक प्रवर्गासाठी परीक्षा कितीवेळा द्यावी, याची नियमावली आखून दिलेली आहे. पूजा खेडकर यांनी स्वतःचे, कधी वडील आणि आईचे नाव बदलून, तसेच स्वतःचा फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी आणि फोन नंबर बदलून अनेकवेळा यूपीएससीची परीक्षा दिली, असे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पत्रकात म्हटले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नोंदीनुसार पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातून नागरी सेवा परीक्षा – २०२२ मध्ये देशभरातून ८२१ क्रमांक मिळविला होता. ११ जुलै रोजी केंद्राने पूजा खेडकर यांच्या ओबीसी नॉनक्रिमीलेयर आणि अंपगत्वाच्या प्रमाणपत्राबद्दल चौकशी करण्यासाठी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव मनोज कुमार द्वीवेदी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली होती.
प्रकरण कसे समोर आले?
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून कामकाज सुरू केल्यानंतर विशेष दालन, सरकारी निवासस्थान आणि वाहनाची मागणी केली. तसेच स्वतःच्या खासगी आलिशान वाहनाला अंबर दिवा लावला. खासगी वाहनावर अशाप्रकारे अंबर दिवा लावता येत नाही. तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांचा कक्ष ताब्यात घेतल्यामुळे त्यांच्याविरोधात नाराजी पसरली. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याची मुख्य आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.
तसेच पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा करत पूजा खेडकर यांची संपत्ती आणि त्यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या मालमत्तेची आकडेवारी समोर आणली. ओबीसी नॉनक्रिमिलेयर प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा फक्त आठ लाख असताना खेडकर कुटुंबीयांकडे कोट्यवधीची मालमत्ता आढळून आली. त्यामुळे या प्रकरणाची देशभर चर्चा झाली.