कोल्हापूर : इचलकरंजी साडेतीन-चार लोकसंख्येचे शहर. इतकी लोकसंख्या असूनही केवळ एका खो -खो खेळामध्ये किमान तीन हजारावर राष्ट्रीय पातळीवर नैपुण्य दाखवलेले खेळाडू या नगरीतून चमकले असल्याचा वैभवशाली इतिहास आहे. एका अर्थाने हा विक्रमी आकडा म्हणावा लागेल.कुस्ती, कबड्डी, खो-खो या भारतीय खेळाचा पगडा महाराष्ट्रातील खो खो इतिहास जनमानसावर दिसून येतो. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या काळात खो- खो खेळाला गती मिळाली. यातूनच ६० च्या दशकामध्ये महाराष्ट्र खो-खो महासंघाची स्थापना झाली. तेव्हाच महाराष्ट्र, विदर्भ आणि कोल्हापूर अशा तीन संघांना राज्य संघाची मान्यता मिळून खेळाची सुधारित नियमावली आकाराला आली.
कोल्हापूरला राज्य मान्यता
कोल्हापूर संघाचे कार्यक्षेत्र शिवाजी विद्यापीठाच्या पाच जिल्ह्यांपुरते होते. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर खो-खो असोसिएशनची वाटचाल सुरू झाली. पुढे ८० च्या दशकानंतर त्याचा केंद्रबिंदू इचलकरंजीत स्थिरावला. तेव्हापासून गेल्या ४५- ५० वर्षात कोल्हापूर खो-खो संघात इचलकरंजीच्या खेळाडूंचा वरचष्मा कायमस्वरूपी राहिला.
इचलकरंजी गुणवंतांची खाण
कोल्हापूरला दर्जा मिळाल्यापासून संघात इचलकरंजीचाच प्रभाव प्रामुख्याने राहिला. राष्ट्रीय खो खो स्पर्धांमध्ये १४ वर्षाखालील किशोर – किशोरी, १८ वर्षाखालील कनिष्ठ मुले- मुली व खुल्या पुरुष व महिला अशा तिन्ही गट असतात. प्रत्येक गटात १२ खेळाडूंचा समावेश असतो. म्हणजे दरवर्षी साधारणतः ७२ खेळाडूंचा सहभाग असे. अलीकडच्या काळात संघात १५ खेळाडू समाविष्ट केले जात असल्याने राष्ट्रीय स्पर्धेत दरवर्षी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या आता ९० इतकी झाली आहे. त्यामुळे ढोबळमानाने दरवर्षी इचलकरंजीचे सरासरी ७३ खेळाडू गृहीत धरले (आणि त्यात काही नवे – काही जुने ) तरी प्रत्येक वर्षी किमान ३५ ते ४० खेळाडू राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. खेरीज, देशातील सर्वोत्तम आठ संघांची फेडरेशन चषक स्पर्धा होत असते. त्यामध्ये आतापर्यंत १२ हुन अधिक वेळा कोल्हापूर संघाचा सहभाग राहिला आहे.
गुणात्मक कामगिरी
मुख्य म्हणजे कोल्हापूर संघाने राष्ट्रीय स्पर्धेत आतापर्यंत देशातील पहिल्या तीन संघात येण्याची कामगिरी ५० पेक्षा अधिक वेळा करून गुणवत्ता अधोरेखित केली आहे. महाराष्ट्र, रेल्वे नंतर कोल्हापूर संघाच्या कामगिरीची देशपातळीवरील खो – खो क्रीडा वर्तुळात कौतुक मिश्रित चर्चा असते. फेडरेशन चषक स्पर्धेत पहिल्या- दुसऱ्या स्थानी राहण्याची कामगिरी सातत्याने बजावलेली आहे. राष्ट्रीय, दक्षिण आशियाई, आशियाई, विश्वचषक स्पर्धात भरीव कामगिरी केलेल्या खेळाडूंची नोंद हा आणखी वेगळा पराक्रम !
अधिकृत संकलन सुरु
या आकडेवारीचा विचार करता इचलकरंजी सारख्या ना तालुका , ना जिल्हा असलेल्या शहरात सुमारे तीन हजार राष्ट्रीय स्पर्धा खेळलेले खेळाडू आहेत. राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या जाणकार, अनुभवी खेळाडूंकडून ही संख्या ५ हजाराहून हून अधिक असल्याचा दावा केला जातो. अलीकडे कोल्हापूर जिल्हा खो खो महासंघाच्या वतीने राष्ट्रीय, फेडरेशन चषक, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंचे संकलन करण्याची काम सुरू झाली आहे. ते पूर्ण झाल्यानंतर अधिकृत आकडा हाती येईल. तो काही हजारात तद्वत स्मितीत करणारा असणार हे मात्र निश्चित.