आयसीटीच्या आधारावर मूल्यांकन होणार

विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी ‘नॅक’ समितीकडून येत्या जुलपासून नवीन कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवीन मूल्यांकन आयसीटी (इन्फोम्रेशन कम्युनिकेशन  टेक्नॉलॉजी)च्या आधारावर होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यप्रणालीनुसार मूल्यांकन करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रस्ताव पाठविणे अनिवार्य राहणार असून त्यानंतर महाविद्यालय व विद्यापीठांना नवीन कार्यप्रणालीनुसार ‘नॅक’ समितीला सामोरे जावे लागणार आहे. यासंदर्भात ‘नॅक’चे संचालक डी.पी. सिंग यांनी नुकतीच सूचना जारी केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने सुमारे एक तपापूर्वी सर्व महाविद्यालयांना ‘नॅक’चे मूल्यांकन तसेच दर पाच वर्षांनी पुनर्मूल्यांकन अनिवार्य केले असून त्यानुसार महाविद्यालयांची वर्गवारी करण्यात येते. प्रत्येक महाविद्यालयातील भौतिक सुविधा, गुणवत्ता व अन्य बाबी नॅक समितीमार्फत तपासण्यात येतात. त्यानंतर महाविद्यालयांना वर्गवारी जाहीर करण्यात येते. त्या वर्गवारी आधारावर महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) अनुदान मिळते. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे उच्चशिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक महाविद्यालयांनी ‘नॅक’कडून मूल्यांकन करुन घेणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाकडून महाविद्यालयांना वारंवार सूचनाही देण्यात आल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून राज्यातील काही महाविद्यालयांनी नॅकद्वारे मूल्यांकन करून घेण्यास वारंवार टाळाटाळ केली. त्यामुळे अनेक महाविद्यालयांचे वेतन अनुदान बंद असून, नवीन पदे भरण्यास बंदी केली. नवीन विषय किंवा तुकडी घेण्यासाठीही ‘नॅक’द्वारे मूल्यांकन करून घेणे आवश्यक आहे. वरिष्ठ महाविद्यालयांसाठी अतिशय महत्त्वाचे असलेल्या ‘नॅक’ मूल्यांकनाचे स्वरूप आता बदलणार आहे. ‘नॅक’च्या संचालकांनी जाहीर केलेल्या सूचनेनुसार आता ‘आयसीटी’वर आधारित नॅकची मूल्यांकन कार्यप्रणाली राहणार आहे. आगामी जुल महिन्यापासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. त्यापूर्वी जुन्या पद्धतीनुसार मूल्यांकन करून घेण्याची शेवटची संधी नॅकने दिली आहे. जुन्या पद्धतीनुसार नॅक समितीकडून मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन करून घेण्यासाठी ३१ मार्च २०१७ पर्यंत नॅककडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. त्यानंतर नॅककडून जुनी कार्यप्रणाली कायमची बंद करण्यात येणार आहे.

जुलपासून सुरू होणाऱ्या नवीन कार्यप्रणालीमध्ये काही जुन्या बाबींसह नवीन मुद्दय़ांचा समावेश करण्यात येणार आहे. नवीन प्रणालीनुसार ‘नॅक’ समितीला सामोरे जाणे  महाविद्यालयांना अवघड जाणार असल्याचे मत उच्चशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. सध्याच्या कार्यप्रणालीमध्ये मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांच्या प्रस्तावाचा आधार घेऊन ‘नॅक’ समिती समोर जाणे सहज शक्य आहे. मात्र, नवीन कार्यप्रणालीमध्ये ते शक्य होणार नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन कार्यप्रणालीमध्ये महाविद्यालयात शिक्षणासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञान आणि शिक्षण, ग्रंथालय, संशोधन, परीक्षा आदींसाठी होणारा ऑनलाइनचा वापर यावर विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती आहे. जागतिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत होणाऱ्या बदलानुसार आता ‘नॅक’नेही आपल्या मूल्यांकन पद्धतीमध्ये विशेष बदल केला आहे.

कठोर मूल्यांकन – डॉ. सुभाष भडांगे

‘नॅक’च्या नवीन कार्यप्रणालीनुसार वरिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यांकन सध्यापेक्षा अधिक कठोर राहण्याची शक्यता आहे. आधुनिक स्पध्रेच्या युगानुसार महाविद्यालयांमध्ये शिक्षण दिले जाते की नाही याची पडताळणी या मूल्यांकनात होईल, अशी माहिती अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी दिली.

Story img Loader