अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून आज (बुधवार, ५ जुलै) मुंबईत मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन केलं. बहुसंख्य आमदार अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित होते. तर शरद पवारांच्या बैठकीला केवळ १३ आमदारांनी उपस्थिती लावली.
ही बैठक पार पडल्यानंतर आता शरद पवारांना आणखी एक धक्का बसला आहे. सकाळी बैठकीला उपस्थित असणारे मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. शरद पवारांचा मेळावा पार पडल्यानंतर आमदार भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवास्थानी जाऊन त्यांना समर्थन दिलं आहे.
हेही वाचा- शरद पवारांकडे संख्याबळ किती? बैठकीला कोणते आमदार-खासदार उपस्थित? पाहा संपूर्ण यादी
अवघ्या काही तासांत देवेंद्र भुयार यांनी यूटर्न घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान, शरद पवार गटातील आणखी काही आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे. त्यामुळे शरद पवार गटातील आणखी काही आमदार अजित पवार गटात सामील होणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.