सांगली: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर महापालिका क्षेत्रातील १० नगरसेवक आणि ग्रामीण भागातील १५ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या संपर्कात असल्याचा दावा माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी बैठकीत केला. यावेळी उपस्थितांनी अप्रत्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर नाव न घेता टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यानंतर जिल्ह्यातही त्याचे परिणाम दिसत असून या सर्व कार्यकर्त्यांना संघटीत करून राजकीय दिशा निश्चित करण्यासाठी अजित पवार यांच्या गटात सहभागी झालेल्या आणि होऊ इच्छिणार्या कार्यकर्त्यांची बैठक रविवारी रात्री मिरजेतील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आयोजित करण्यात आली होती. नायकवडी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीस नगरसेवक अतहर नायकवडी, योगेंद्र थोरात, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव पाटील, कवठेपिरानचे भीमराव माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
आणखी वाचा-“शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मनोमीलन….”, दीपक केसरकर यांचं वक्तव्य चर्चेत
यावेळी बोलताना नायकवडी म्हणाले, एखादा कार्यकर्ता कर्तृत्वाने मोठा होऊ लागला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याची नेतृत्वाची वृत्तीच पक्ष विस्ताराला बाधा ठरली आहे. राजारामबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या नेत्यांचा वारसा आम्हाला लाभला असला तरी जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी त्यांचे खङ्खीकरण करण्याची प्रवृत्ती राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी बाळगली. यामुळेच आमचे कार्यकर्ते अशा प्रवृत्तीपासून अलिप्त राहिले असले तरी आता अजितदादांच्या कणखर व रोखठोक भूमिका घेणार्यांच्या मार्गदर्शंनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे नजीकच्या काळात जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळेल.
आणखी वाचा-सांगली : दुष्काळी जतला पाणी मिळावे यासाठी भाजपाचे आंदोलन
सहकार, शिक्षण, शेती या विविध क्षेत्रातील कामांचा अनुभव असणारे नेतृत्व उपमुख्यमंत्री या नात्याने लाभले असून धमक असलेला आणि दिलेल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते असे यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले.