शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे गेलं आहे. याप्रकरणी सलग सुनावणी सुरू झाली असून दोन्ही गटाचे वकिल युक्तीवाद करत आहेत. बहुमत चाचणीवेळी ठाकरे गटाकडून पुकारण्यात आलेल्या व्हीपबाबत सध्या युक्तीवाद सुरू असून हा व्हीप मिळालाच नव्हता असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी आजही विधानभवनात राहुल नार्वेकर यांच्या समक्ष सुनावणी झाली. सुनावणी संपल्यानंतर वकिल असीम सरोदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या घटनेवरून या प्रकरणाचा निकाल लागणार असेल तर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर व्हायला हवं, असं सुचवलं आहे.
असीम सरोदे म्हणाले की, शिवसेनेची मूळ घटना कोणती आणि घटनेच्या आधारे निर्णयाप्रत पोहोचायचं असं असेल तर निवडणूक आयोगाला बोलवावं लागेल. कारण, न्यायाच्या दृष्टीने कोणती घटना मान्य आहे हे निवडणूक आयोगच ठरवू शकतं.
“परंतु, तो प्रश्न विलंबाशी जोडल्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं की, या अर्जामुळे विलंब होणार असेल तर आम्ही हा अर्ज दाखल करत नाही. परंतु, तो रेकॉर्डवर घेण्यात आला आहे. परंतु, याप्रकरणी निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगालाच बोलवा असं आम्ही सांगितलं होतं. कारण, कोणती घटना योग्य की अयोग्य ठरवण्याचा अधिकार निवडणूक आय़ोगाला आहे, विधानसभा अध्यकांना हा अधिकार नाही”, असंही असीम सरोदे म्हणाले.
दरम्यान, आमदार अपात्र प्रकरणी आता उद्या (२ डिसेंबर) सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे.