कराड : अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. १९९९ साली ते काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नसते तर, कदाचित काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव पुढे केले असते. विलासराव देशमुख यांच्यापेक्षा अभयसिंहराजे त्यावेळी ज्येष्ठ असताना त्यांना का बाजूला ठेवलं? संधी का दिली नाही? हे माहीत नाही. परंतु, यामुळे जसे अभयसिंहराजेंच्या नेतृत्वाचे नुकसान झाले तसे ते सातारा जिल्ह्यासह राज्याचेही मोठे नुकसान झाले. कर्तृत्व असतानाही जाणीवपूर्वक डावलणे हा अभयसिंहराजेंवर झालेला मोठा अन्यायच होता, अशी खंत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली.

राज्याच्या मंत्रिमंडळातील नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे या भाजपच्या सातारा जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी मंगळवारी एकत्रितपणे कराडमध्ये माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. या वेळी शिवेंद्रराजे पत्रकारांशी बोलत होते. आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील आदींची या वेळी उपस्थिती होती.

हेही वाचा – साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास

हेही वाचा – Ambadas Danve : छगन भुजबळ हे अजित पवार गटात राहतील की नाही? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “काहीही होऊ…”

ते म्हणाले, अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराजांचे नेतृत्व निष्कलंक, प्रभावी होते. त्यांनी अनेक विकासकामांना चालना दिली, अनेक प्रकल्प पूर्णत्वाला नेले, नऊ दशलक्ष घनमीटर (टीएमसी) क्षमतेचा उरमोडी सिंचन प्रकल्प मार्गी लावला. त्यातून दुष्काळी माण- खटावसह मोठे क्षेत्र आज सुजलाम, सुफलाम झाले आहे. अभयसिंहराजेंना अधिक संधी मिळाली असती, तर सातारा जिल्ह्यासह राज्याचा चांगला विकास झाला असता असे शिवेंद्रराजे भोसले यांनी ठामपणे सांगितले.

Story img Loader