नवाब मलिक हा विषय हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजतो आहे. नवाब मलिक हे गुरुवारी सत्ताधारी बाकांवर बसले होते. देशद्रोहाच्या आरोपाखाली ते तुरुंगात होते. ते महायुती सरकारमध्ये गेल्यानंतर महायुती सरकारवर प्रचंड टीका सुरु झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नवाब मलिक आपल्यासह नकोत हे पत्रही लिहिलं. त्यावर अजित पवार यांनीही पत्राचं काय करायचं मी पाहतो असं म्हटलं आहे. आता या सगळ्यात अजित पवारांची भूमिका महत्त्वाची आहे असं बच्चू कडू म्हणाले आहेत. तसंच एक महत्त्वाची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
अजित पवार आणि नवाब मलिक यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. नवाब मलिक उद्या म्हणाले की मला अजित पवारांसह जायचं आहे आणि अजित पवार जर म्हणाले की नाही घेत त्यांना तर खरा पिक्चर सुरु होईल. त्या त्या पक्षाची धोरणं सांभाळायचा आहे. नवाब मलिकचा विषय फडणवीस यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. मी त्यांच्या मनातलं कसं काय सांगणार? असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
महायुती सरकारमध्ये सगळं काही आलबेल आहे. आम्ही १५० होतो आता २०० झालो आहोत असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे चुलीत घाला. मला काही घेणंदेणं नाही असंही ते म्हणाले आहेत.
विशेष अग्रलेख –नवाब मलिक नकोत; पुढे?
देवेंद्र फडणवीस यांची नाराजी
देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांना अजित पवार गटात सहभागी करून घेण्यावरून आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी रीतसर पत्र लिहून नवाब मलिकांच्या सरकारमधील समावेशाला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, “आमच्या भावनांचा आपण विचार कराल”, अशा सूचक शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पत्राचा शेवट केला आहे. त्यामुळे यावरून तर्कवितर्कांना उधाण आलेलं असताना अजित पवारांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना नवाब मलिकांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचं सांगितलं आहे.
“आधी नवाब मलिकांची स्पष्ट भूमिका येऊ द्या”
“नवाब मलिक कालच सभागृहात आले होते. ते कुठे बसले हे टीव्हीवाल्यांनीच दाखवलं आहे. यात स्वत: नवाब मलिकांची भूमिका अद्याप आलेली नाही. आम्ही महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदाच ते सभागृहात आले. त्यांची भूमिका काय आहे हे पाहावं लागेल. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांची भूमिका ऐकल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचं पत्र मला मिळालं. मी ते वाचलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.