भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज(रविवार) वर्धा येथे पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आणि शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित केले. याशिवाय शिवसेनचा मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसबाबतही राणेंनी यावेळी खोचक टिप्पणी केली.
हेही वाचा : शिवसेनेचा अस्त जवळ आला आहे; आता मला काळजी एवढीच आहे की… – नारायण राणे
नारायण राणे म्हणाले “बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर उद्धव ठाकरे केव्हाही कधीही मुख्यमंत्री झाले नसते. उद्धव ठाकरे असताना बाळासाहेबांनी १९९९ मध्ये मला मुख्यमंत्री केलं होतं, मग तेव्हा त्यांना नसतं केलं का?, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाला लायक व्यक्ती नाही. त्यांना महाराष्ट्र व जनतेची काही माहिती नाही. हिंदुत्वाशी गद्दारी करून ते निवडून आले. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भाजपाशी युती करून मोदींच्या आणि हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितली आणि निवडून आल्यानंतर केवळ मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यांनी केवळ मुख्यमंत्रीपदासाठीच ही गद्दारी केलेली आहे. म्हणून आता हे जे खोके-खोके वाजताय हे त्यांचंच पाप आहे.”
शिवसेना आता अस्तित्वात आहे का? –
याचबरोबर “दसऱ्याच्या दिवशी त्यांचं पितळ उघडं पडेल. शिवसेना आता अस्तित्वात आहे का? उरलेसुरले आमदारही लवकरच शिंदे गटात जातील. उद्धव ठाकरेंची स्मरणशक्ती कमजोर झाली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची शिवसेना ही मराठी माणसाला आणि हिंदुत्वाला न्याय देऊ शकत नाही. म्हणून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या शिवसेना रामराम ठोकून शिवसैनिक शिंदे गटात चालले आहेत, कारण त्यांना विश्वास वाटतोय.” असंही यावेळी राणेंनी सांगितलं.
काँग्रेसला मायबापच राहिलेला नाही –
तर काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार असणाऱ्या शशी थरूर यांनी २०२४ मध्ये काँग्रेस सक्षम पक्ष राहील असं पत्रकारपरिषदेत विधान केलेलं आहे, यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणेंनी “काँग्रेसला मायबापच राहिलेला नाही. आता कुठे दिसतेय का काँग्रेस?, तुमचा अध्यक्ष कोण, कोण सांभाळणार? काँग्रेस आता संपली. आता फक्त एकच नाव घ्या भारतीय जनता पार्टी. देशात एक-दोन पक्ष औषधासाठी ठेवू.”