अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा झाली. देवाचे आशीर्वाद आणि देवाच्या इच्छेमुळेच हे होऊ शकले, असे वक्तव्यं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. पुण्यातील आळंदी येथे गीता भक्ती अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. भागवत पुढे म्हणाले, “भारताला यापुढे आणखी ताकदीने पुढे यावे लागेल. जगाच्या पाठीवर भारताला आपले स्थान आणखे वर न्यावे लागेल, भारताने प्रगती साधली नाही तर जगाला अडचणींचा सामना करावा लागेल.”
अयोध्येत राम मंदिराचे निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष आणि खूप त्याग केल्यानंतर २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणे शक्य झाले, असेही ते म्हणाले. आताची पिढी खरंच भाग्यवान आहे, त्यांना अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. राम मंदिरांसाठी अनेकांनी प्रयत्न केलेच, पण देवाची इच्छा होती, त्यामुळेच हे होऊ शकले, असेही ते म्हणाले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.
मोहन भागवत पुढे म्हणाले, जर आगामी काळात कोणत्याही कारणामुळे भारताचा उदय होऊ शकला नाही तर विश्वाला अडचणींचा सामना करावा लागेल. याबद्दल जगभरातील बुद्धिजीवी वर्गाला कल्पना आहे. याबद्दल ते चर्चाही करतात.
Video: “ही तीन मंदिरं प्रेमाने मिळाली, तर आम्ही मागचं सगळं विसरून जाऊ”, गोविंद देव गिरी महाराजांचं विधान चर्चेत!
गीता परिवाराकडून गीता भक्ती अमृतमहोत्सव आयोजित करण्यात आला होता. आध्यात्मिक गुरु श्री गोविंद देव गिरी महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.