आम्ही भाजपासोबत बसायला तयार आहोत. कारण कोणताही पक्ष हा एकमेकांचा राजकीय शत्रू सध्याच्या घडीला नाही. मतभेद असू शकतात, हे मतभेद टोकाचे ठरू शकतात. पण भाजपा आणि संघाने जर मनुस्मृतीची विचारधारा सोडली तर आम्ही त्यांच्यासोबतही बसायला तयार आहोत असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी?
आजच्या घडीला कुठलाही पक्ष कुठल्या पक्षाचा शत्रू नाही. टोकाचे मतभेद असू शकतात. आमचे आणि आरएसएस, भाजपाचे टोकाचे मतभेद आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भाजपा असो ते आजही मनुस्मृती मानतात. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. भाजपा आणि संघाने जर मनुस्मृती सोडली आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
Vanchit Bahujan Aaghadi: “माझी युती शिवसेनेबरोबर, मला इतरांचं…” प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले!
बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं ते मोहन भागवतांनी करावं
एका पत्रकार परिषदेत मला विचारण्यात आलं होतं की काय कृती केली म्हणजे तुम्ही म्हणाल की भाजपाने आणि संघाने मनुस्मृती सोडली. मी त्यांना उत्तर दिलं की जे बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये केलं ते जर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये करावं तर आम्ही मान्य करू. मनुस्मृती हा धर्मग्रंथ नाही. मनुस्मृती हा सामाजिक आणि राजकीय व्यवस्था सांगणारा ग्रंथ आहे. त्यामध्ये RSS आणि भाजपा बदल करणार असेल जो बदल सरदार पटेल यांनी जुलै १९४९ मध्ये केला होता तो त्यांनी मनाने स्वीकारावा. ते बदलणार असतील तर ते आमचे शत्रू नाहीत. राजकीय समझौता कधीही होऊ शकतो. असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण
“इतिहासातील काही घटनांवरून मी ते विधान केलं होते. त्याचा आताच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. कोणी त्याला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही”, असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. “भाजपाला तुम्ही कमी लेखू नका. भाजपा कोणत्याही परिस्थिती कोणत्याही स्थराला जाऊ शकते. भांडण लावणे, मतभेत निर्माण करणे हा त्यांचा फंडा आहे. जेव्हा आपण निवडणूक जिंकत नाही, असं भाजपाला वाटतं तेव्हा ते भांडणं लावण्याचं काम करतात, अशी टीकाही त्यांनी भाजपावर केली.