महाराष्ट्र नवनिर्माण सनेच्यावतीनं शिवाजी पार्कमध्ये आय़ोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर दिसून आले. या तिघांनाही एकाच मंचावर पाहून भविष्यात शिंदे गट, भाजपा आणि मनसेची युती होणार की काय यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. शिवतिर्थावर लावलेले बॅनर्स तरी युतीच्या दिशेने सूचक इशारा करणारे होते. मात्र असं असतानाच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या तिन्ही नेत्यांनी अशाप्रकारे एकत्र येण्यावरुन प्रतिक्रिया देताना खरंच युती झाली असेल तर जाहीर करावं असं आवाहन केलं आहे.
मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांसाठी पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी व्हिडीओ जारी करत प्रतिक्रिया नोंदवली आहे. यामध्ये त्यांनी खरोखर युती झाली असल्यास ती जाहीर करावी छुप्या पद्धतीने राजकारण करु नये असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे पूर्वी मनसेमध्ये असलेल्या रुपली ठोंबरे-पाटील यांनी आपल्याच आधीच्या पक्षाला शाब्दिक टोला लगावल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे. “नुकताच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दिवाळीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. खरंच युती झाली असेल तर ती जगजाहीर करावी. छुप्या पद्धतीने गोष्टी होत असतात आणि नंतर आमची युती आहे किंवा नाही हे सांगण्याची वेळ येत नाही,” असं ठोंबरे म्हणाल्या.
“दिवाळीच्या कार्यक्रमांसाठी कोणीही कुठेही उपस्थित राहू शकतं. पण मनसेच्या सुख दुखात उभं राहत असताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी अंतरकरणाने उभे रहावे,” असंही ठोंबरे यांनी म्हटलं आहे. तसेच, “युती असेल तर कृपया करुन ती जगजाहीर करा. नसेल तरी जगजाहीर करा. छुप्या पद्धतीने जे काही कटकारस्थान चालतात त्यामधून संभ्रम निर्माण करणे, राजकारणाचा दर्जा खालावण्यासारखे प्रकार होऊ नयेत असं आम्हाला वाटतं,” असंही ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
“जो काही दिवाळीचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शिंदेंना आणि फडणवीसांना दिवाळीच्या शुभेच्छा नक्कीच आहेत. शिंदे आणि फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या अडचणीवर सुद्धा प्रकाश टाकावा. जनतेची दिवाळी सुद्धा आनंदाची, समाधानाची, भरभराटीची जावी यासाठी काम करावं अशी मी दिवाळीच्यानिमित्ताने मागणी करते,” असंही आपल्या या व्हिडीओच्या शेवटी ठोंबरे यांनी म्हटलं आहे.