मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होईल, यामुळे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ आंदोलन चालू केले आहे. त्यांनी उपोषण स्थगित केले असले तरीही अभिवादन दौरे सुरू केले आहे. काल रात्री ते बीड जिल्ह्यातील मातोरी गावात जात असताना टीव्ही ९ ने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

“ओबीसी भाजपासाठी आहेत असं म्हणत असतील तर देवेंद्र फडणवीस पुढे का येत नाहीत? बोलत का नाहीत? आम्ही त्यांच्याकडे वेगळं काही मागत नाहीत. ओबीसी आरक्षण हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे. या आरक्षणाच्या बाजूने फक्त बोला. तुम्ही संविधानिक पदावर आहात, आमच्या हक्काचं आणि अधिकाराचं संरक्षण करा, यापेक्षा वेगळं आम्ही काहीही सांगत नाही. भाजपाचा डीएनए ओबीसी असेल तर त्यांनी समोर आलं पाहिजे. त्यांनी वास्तव आणि ठाम भूमिका घेतली पाहिजे. मराठा समाजाचं शिष्टमंडळ आलं की त्यांना म्हणायचं आरक्षण देतो, ओबीसींचं शिष्टमंडळ आलं की त्यांना म्हणायचं तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. दोन्ही बाजूने कसं चालेल”, असं म्हणत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

हेही वाचा >> लक्ष्मण हाकेंचा ताफा मनोज जरांगेंच्या गावात पोहोचताच दगडफेक, दोन गट आमने-सामने; गावात तणावपूर्ण शांतता!

“एसटी, धनगर समाजाची लढाई चार पिढ्या लढत आहेत. पण आमच्या ताटातलं ओबीसी आरक्षण हिरावून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करणं हे धनगर समाजाचं कर्तव्य आहे. तसंच, गावगाड्यातील सर्व ओबीसींनी एकत्र येऊन संरक्षण करणं प्रथम कर्तव्य आहे”, असंही आवाहन त्यांनी ओबीसी समाजाला केलं.

आमची संभ्रम अवस्था दूर करा

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणार असं सरकारकडून सांगण्यात आलंय. यावर हाके म्हणाले, “तेच कसं देणार याचं उत्तर ओबीसींना पाहिजे. एकाबाजूला जरांगे म्हणत आहेत की आम्ही ओबीसीत घुसतोय, दुसऱ्या बाजूला शासन म्हणत आहे की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, नक्की खरं कोण बोलतंय, ही आमची संभ्रम अवस्था दूर करा, एवढंच आमचं म्हणणं आहे”, असं हाके म्हणाले.