राष्ट्रवादी काँग्रेससारख्या प्रादेशिक पक्षांशी आघाडी नको ही मागणी बरोबरच आहे; पण त्यासाठी आपले तीनशे खासदार निवडून आले पाहिजे. आपल्याला पूर्ण बहुमत मिळाले, तरच कोणाबरोबर आघाडी करावी लागणार नाही, अशी भूमिका मांडत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी एकहाती सत्ता आणण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन काँग्रेसजनांना केले.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा मिळून २२ जिल्ह्य़ांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी तसेच लोकप्रतिनिधींशी राहुल यांनी बुधवारी येथील बालेवाडी क्रीडासंकुलात संवाद साधला आणि वेगवेगळ्या बैठकांमध्ये मार्गदर्शनही केले. तीन-तीन जिल्ह्य़ांच्या एकत्रित बैठकांमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बोलण्याची संधी दिली जात होती. काँग्रेसची ताकद अनेक ठिकाणी वाढली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीकडून काँग्रेसला त्रास दिला जात आहे, काँग्रेसने आता स्वबळावरच लढले पाहिजे, अशा शब्दात पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्यांची भावना राहुल यांच्याजवळ व्यक्त करत होते.
या तक्रारीबाबत राहुल यांनी सांगितले, की आपल्याकडे पूर्ण बहुमत नसल्यामुळे प्रादेशिक पक्षांशी आघाडी करावी लागत आहे. त्यासाठी केंद्रात स्वबळावर आपल्या तीनशे जागा निवडून आल्या पाहिजेत. पूर्ण बहुमत मिळणार असेल, तर मग राष्ट्रवादी, एआयडीएमके अशा कोणत्याच प्रादेशिक पक्षाशी आपल्याला आघाडी करावी लागणार नाही. त्यासाठी एकहाती सत्ता आणावी लागेल आणि ती जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे.
प्रदेश कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि राहुल यांची भाषणे झाली. या वेळी राहुल म्हणाले, ‘की यापूर्वीच्या सन २००४ आणि ०९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात जोरदार प्रचार करण्यात आला होता. मात्र, दोन्ही वेळा काँग्रेसचीच सत्ता आली. वैचारिक लढाई देत आपल्याला आगामी निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. सत्ता काँग्रेसचीच येणार असली, तरी पक्षात तू तू, मैं मैं चालणार नाही. तसेच कोणी पक्षाशी दगाफटका केला, तर निश्चितच दखल घेतली जाईल. जो पक्षाचा खरा कार्यकर्ता आहे त्याला ओव्हरेटक करून पुढे आणा.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा