मागील दीड वर्षाहून अधिक काळापासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह संबंधित आमदार अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्री पदावर इतर नेत्याची वर्णी लागेल, असा दावा विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. या सर्व चर्चेवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र होणारच नाहीत. मात्र ते अपात्र झाले तरीही तेच मुख्यमंत्री राहणार असं मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. याबाबत त्यांनी ‘प्लॅन बी’ सांगितला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेवर निवडून आणलं जाईल आणि तेच पुढे मुख्यमंत्री कायम राहतील, असं विधान फडणवीसांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अपात्रतेवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एक गृहितक म्हणून सांगतो की, एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवलं तरी ते मुख्यमंत्री राहू शकतात. ते विधान परिषदेवर येतील पण ते अपात्र होणारच नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे अपात्र होतील, असा तर्क लावणं चुकीचं आहे. आमच्याजवळ अशी संख्या आहे, ज्यामुळे कुणीही अपात्र झालं तरी आम्हाला काही अडचण नाही. पण आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून काम केलं आहे. कुठेही कायद्याची चौकट आम्ही तोडली नाही. जी काही केलंय ते कायदा पाहून आणि नियमांत बसेल असंच केलं आहे. त्यामुळे आम्हाला काहीही भीती नाही.”
हेही वाचा- “अजित पवारांचा निर्णय योग्यच, त्यांनी संघर्ष…”, ‘त्या’ निर्णयावर शरद पवारांचं मोठं भाष्य
एकनाथ शिंदेंना विधान परिषदेतून निवडून आणणं हा भाजपाचा ‘प्लॅन बी’ आहे का? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “भाजपाला ‘प्लॅन बी’ची गरजच नाही. आमच्याकडे केवळ ‘प्लॅन ए’ आहे, तो ‘प्लॅन ए’ म्हणजे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि ते अपात्र होणार नाहीत. याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, कारण आम्ही कायद्याचा अभ्यास केला आहे.”