शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आता दोन वेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत. यामध्ये वरळीच्या एनआयसी डोम या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला. तिथे डोमकावळे जमलेत असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय?
“लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. मग आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं?”, असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला. एवढंच नाही तर आम्ही जर ईव्हीएम हॅक केलं असतं तर यामिनी जाधव आणि राहुल शेवाळे जिंकून आले असते असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
१३ जागांवर आपण उद्धव ठाकरेंसमोर लढलो
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत १३ जागांवर आपण आणि उद्धव ठाकरे समोरासमोर लढलो. त्यापैकी, आपण सात जागा जिंकलो. मग, त्यांच्यापेक्षा सरस कोण? खरी शिवसेना… बाळासाहेबांची शिवसेना कोणाची, असा सवाल करत जनतेनं आपल्याला कौल दिल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. ग्रामपंचायतीमध्येच जनतेने ट्रेलर दाखवला होता, आपले २२०० सरपंच निवडून आले होते. देशातील लोकसभा निवडणुकांच्या जागांचा विचार केल्यास काँग्रेस काठावर पण पास नाही. मात्र त्यांना उन्माद इतका की जणू देशात सरकार आलं आहे, दुसरीकडे उबाठा जीत का जश्न मना रही है. गिरे तो भी टांग उपर असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.
तर यामिनी जाधव अन् शेवाळेही निवडून आले असते
दक्षिण मुंबईत यामिनी जाधव यांचा पराभव झाला. कशाच्या जीवावर कोणाच्या मताने तिथे विरोधी उमेदवार जिंकले. राहुल शेवाळे यांचेही असेच झाले आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातील काही मतदान केंद्रावर पडलेल्या मतांची आकडेवारीच वाचून दाखवली. ईव्हीएमच्या मुद्द्यावर भाष्य करताना, या पराभवांचा दाखलाही दिला. ईव्हीएम हॅक केलं असतं तर यामिनी जाधव अन् राहुल शेवाळेही निवडून आले असते, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व कुठे गेलं?
“शिवतीर्थावर भाषण करताना सर्व इंडिया आघाडीचे नेते होते. पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…, असं म्हणू शकले नाहीत. आजही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणाले नाही. मग तुमचं हिंदुत्व कसलं आहे? बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. गर्व से कहो हम हिंदू है, ही गर्जना बाळासाहेबांनी देशात गाजवली. आता उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व कुठं गेलं? त्यामुळे धनुष्यबाण पेलण्याची ताकद आपल्यात आहे. आज आपण लोकसभेच्या ७ जागा जिंकलो. आता महायुतीमध्ये माझी जबाबदारी जास्त आहे. ती जबाबदारी सर्वांच्या साक्षीने पार पाडणार आहे.” असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलंय.