“गृहमंत्री पद दिले तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करु”, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केले आहे. अंबरनाथमध्ये मनसेतर्फे संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्त्व्य केले.
संवाद दौऱ्यानिमित्त मुंबई ते अंबरनाथ लोकल प्रवास
शुक्रवारी संवाद दौऱ्यानिमित्त अमित ठाकरे यांनी मुंबई ते अंबरनाथ लोकल प्रवास केला. त्यानंतर अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंत्रिमंडळ विस्तारात मनसेला दोन पदे मिळणार असल्याची चर्चा सुरु असल्याबाबत पत्रकरांनी अमित ठाकरेंना प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना अमित ठाकरेंनी सूचक विधान केले. “गृहमंत्री पद देणार असतील, तर सत्तेत सहभागी होऊ पण ते देत नाहीत ना”, असा मिश्किल टोलाही अमित यांनी लगावला.
१५ दिवसांत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील हजारो विद्यार्थ्याशी संवाद
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी १५ दिवसांत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील हजारो विद्यार्थ्याशी संवाद साधला. तसेच नवीन नेमणुका जाहीर केल्या. यानंतर अमित ठाकरे सात दिवसांसाठी कोकण दौऱ्यावरही गेले होते. या सात दिवसात त्यांनी तालुका तसेच गाव पातळीवरील स्थानिक मनसे आणि मनविसे पदाधिकारी, महाविद्यालयीन तरुण -तरुणींशी संवाद साधला.
मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद
मनविसे ही महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना बनवण्याचा निर्धार अमित ठाकरे यांनी मुंबईतील प्रत्येक बैठकीत व्यक्त केला होता. मुंबईत अमित ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.