उस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनात शासनाने लक्ष घालून मार्ग काढला नाही तर २१ नोव्हेंबर रोजी सांगली येथे तिन्ही शेतकरी संघटनांची एकत्रित परिषद होऊन आंदोलनाचे नवे स्वरूप जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी सांगली येथे पत्रकारांना दिली. तर, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणारे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या अंजनी गावात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
शरद जोशी यांनी गोळीबारात ठार व जखमी झालेल्यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर ते म्हणाले,शासन साखर कारखानदारांशी चर्चा करा असे सांगते. पण साखर कारखानदार हेच कसाई असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या भावना समजत नाहीत.
शरद पवार यांनी खासदार शेट्टी यांच्या जातीच्या केलेल्या उल्लेखाविषयी जोशी यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले,पवार व त्यांच्या बगलबच्च्यांची ही जुनी पध्दत आहे. शालिनीताई पाटील यांनीही शरद जोशी हे ब्राह्मण आहेत, त्यांना शेतीतील काय कळते अशी बिनबुडाची टीका केली होती. खरेतर जो शेती करतो तोच खरा शेतकरी आहे. पवार हे राजकारणी असल्याने त्यांना शेतीतील कांही कळत नसल्याने याविषयावर त्यांनी बोलू नये.
सदाभाऊ खोत म्हणाले,की सध्या निर्माण झालेल्या ऊस दराच्या कोंडीला पवार काका-पुतणे, मुख्यमंत्री,अर्थमंत्री व सहकारमंत्री हेच जबाबदार आहेत. शेतकऱ्यांना मारझोड करून आंदोलन निपटून काढण्याचा या सर्वांचा प्रयत्न आहे.  
शेतकऱ्यांवर लाठय़ा उगारणाऱ्या गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या अंजनी गावात आम्ही आंदोलन करणार आहोत. आंदोलन होऊ नये यासाठी जमावबंदीसह कितीही आदेश शासनाने काढले तरी ते झुगारून आंदोलन केले जाणार आहे. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांवर किती गोळ्या घालायच्या हे त्यांनीच ठरवावे.

Story img Loader