कोणाला काय खाते द्यायचे हे मी ठरवतो. अर्थ खाते द्यायला संमती आहे, पण रंगकर्मीची कामे न केल्यास त्याचाही फेरविचार करू, अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी आपले पुतणे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समज दिली. ९३व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या उद्घाटनासाठी शनिवारी व्यासपीठावर एकत्र आलेले पवार, अजितदादा आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जुगलबंदी नाटय़रसिकांना राजकीय नाटिकेचा आनंद दिला. अजितदादांना अर्थ खाते मिळेल, असे सांगतानाच ‘ऊर्जा’ खात्याचा उल्लेख टाळून ते खाते त्यांच्याकडून काढून घेण्याचे संकेतही पवारांनी दिले.
९३व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने अजित पवार व्यासपीठावर होते. ‘मी उपमुख्यमंत्री असलो तरी आजपर्यंत बिनखात्याचा मंत्री आहे. रंगकर्मीचे प्रश्न सोडविण्यासाठी भरीव तरतूद करण्याची आवश्यकता असल्याने आपल्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवावी,’ अशी विनंती अजित पवार यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांकडे केली.
हा धागा पकडून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘आघाडी सरकारमध्ये कोणी कोठे राहायचे हे तो तो पक्ष ठरवितो. आम्हाला विश्वासात न घेताच त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता मंत्रिमंडळामध्ये परत येण्याचा निर्णयही त्यांनीच घेतला आहे. त्यांचे मंत्रिमंडळामध्ये स्वागतच आहे. त्यांच्या अपेक्षेनुसार अर्थ आणि ऊर्जा या खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात येईल.’
त्यावर आपल्या खास शैलीत शरद पवार यांनी टिप्पणी केली. मुख्यमंत्र्यांकडे पाहत ते म्हणाले, ‘तुमच्या संघटनेमध्ये हा निर्णय कोठे होतो हे तुम्हालाही ठाऊक आहे. आमच्या संघटनेमध्ये हा निर्णय ‘इथेच’ माझ्याकडे होतो. त्यामुळे तुम्ही दोघे परस्पर काय ते ठरवू नका. अर्थ खाते द्यायला संमती आहे, पण रंगकर्मीच्या मागण्यांची पूर्तता लवकर न झाल्यास त्याचाही फेरविचार करण्यात येईल. अर्थ खाते तुमच्याकडे आले आणि आमचे प्रश्न सुटले असे ऐकण्याची संधी मिळाली पाहिजे.’ अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या. मात्र ऊर्जा खात्याबाबतचा निर्णय त्यांनी गुलदस्त्यामध्येच ठेवला.
‘हा हलकाफुलका विनोद’
मंत्रिमंडळातील खात्यांबाबत पवारसाहेबांनी केलेली विधाने हा ‘लाइट विनोद’ आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पवारसाहेबांच्या या विधानांमधून राजकीय अर्थ काढू नयेत, असे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत.

Story img Loader