राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे या सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात गुंतल्या आहेत. अजित पवार यांच्याकडून बारामतीमध्ये उमेदवार उतरविण्याची घोषणा केल्यानंतर पवार कुटुंबियातील कलह आणखी वाढला असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावर आता सुप्रिया सुळे यांनीच भूमिका व्यक्त केलेली आहे. बुधवारी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवार कुटुंब पार मोठे आहे. एवढ्या मोठ्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीने वेगळी भूमिका घेतली असेल तर त्यानंतर कुटुंबात फूट पडेल असे होत नाही.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपमुख्यंमत्री अजित पवार यांचे नाव न घेता पवार कुटुंबावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, आमच्या कुटुंबात जवळपास १२० ते १२५ सदस्य आहेत. यामध्ये लहान मुलंही आहेत. एवढ्या मोठ्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीने काही वेगळी भूमिका घेतली असेल तर त्यामुळे संपूर्ण कुटुंबात फूट पडेल, असे नाही. आमचे कुटुंब एकत्र होते आणि एकत्र राहिल.
“पवार कुटुंब, माझे सगळे भाऊ या बहिणीसाठी उभे रहात आहेत, कारण…”; सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य
शरद पवार यांना आपल्या मुलीला (सुप्रिया सुळे) मुख्यमंत्री बनवायचे आहे, असा आरोप अमित शाह यांनी केला. याबद्दल सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, मी अमित शाह यांची आभारी आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचारापासून मुक्त केले. याआधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात यायचे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (एनसीपी) नॅच्युरल करप्ट पार्टी म्हणत असत. पण आता भाजपाचे नेते भ्रष्टाचाराबाबत बोलत नाहीत. त्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर केले होते, त्याबद्दल भाजपाचा एकही नेता आता बोलत नाही. त्यासाठी मी भाजपा आणि अमित शाह यांची आभारी आहे.
शिवसेनेसारखे आता आम्ही संघर्षाच्या भूमिकेत; खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
पवार कुटुंब, सगळे भाऊ, वहिनी माझा प्रचार करणार
माझी यावेळी चौथी निवडणूक असून माझे सहकारी, कार्यकर्ते हे माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबातले लोक माझा प्रचार करतील. तसंच पवार कुटुंबातील माझे सर्व भाऊ, वहिनी माझ्या घरातली मुले, राजेंद्र पवार, वहिनी हे सगळे माझ्यासाठी म्हणजेच बहिणीसाठी उभे राहत आहेत. त्याचा मला आनंद वाटतो. त्यांचाही आधार मला वाटतो, असेही विधान सुप्रिया सुळें यांनी केले आहे.