राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणसी यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे. आमदार अमित साटम यांच्या उडान या पुस्तकाचं काल (२९ जून) राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अमित साटम नगरसेवकही नव्हते तेव्हापासून मी तुम्हाला पाहतोय. तुम्ही एक निवडणूक हरला होतात. आणि दुसऱ्या निवडणुकीसाठी तयारी करत होतात. आणि ही निवडणूक तुम्ही जिंकलात. तुम्ही खरंच तुमचं पॅशन करिअरच्या रुपाने घडवलं.” अमित साटम यांचं अशा शब्दांत कौतुक करत असातानाच त्यांनी पॅशन आणि करिअरबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचं नाव न घेता टीका केली.

हेही वाचा >> रा. स्व. संघाकडून प्रदेश भाजपमध्ये पूर्णवेळ संघटनमंत्र्यांची नियुक्तीच नाही, केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्याकडेच जबाबदारी

ते म्हणाले, “कधी काय होतं की कोणाला फोटोग्राफी आवडते आणि ते मुख्यमंत्री बनले तर समस्या निर्माण होते. मी कोणाचं नाव घेत नाहीय, हा राजकीय कार्यक्रम नाही. पण मी एक उदाहारण देतोय. ज्या गोष्टीची पॅशन असते ती आपण केली तर त्याचा फायदा होतो. तुम्ही (अमित साटम) एक चांगला मंत्र आम्हाला दिला आहे.”

“अमित साटम यांनी आपले विचार या पुस्तकातून अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले आहेत, जे नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतील. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक अनुभव वाचकांसमोर मांडले आहेत. अमित साटम यांच्या कल्पनांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ते व्यावहारिक आहेत, याचा अर्थ लोकांना समजून घेणे आणि त्यांच्या जीवनात अंमलात आणणे सोपे होईल”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अमित साटम यांना शुभेच्छा

“अमित यांचे राजकारणात आक्रमक व्यक्तिमत्व आहे. लहानपणापासून श्रीकांत हा त्यांचा आवडता खेळाडू आहे. तेही आक्रमक होते. तसंच, अमित साटम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत. त्यांना त्यांच्या जीवनात आध्यात्मिक प्रेरणा श्री श्री रविशंकरजींमुळे मिळाली आहे. त्यांनी लिहिलेल्या या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन पु. पू. सरसंघचालकांच्या हस्ते होणे ही अभिमानाची गोष्ट आहे”, असं म्हणत त्यांनी अमित साटम यांनी पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या.