आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी ही लढत असून महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. दरम्यान, या लढतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सहभागी होण्याची शक्यता होती. परंतु, मनसेने अद्यापही एकही उमेदवार जाहीर केला नसल्याने लोकसभेबाबतचा निर्णय राज ठाकरे बदलणार आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी तुमची तयारी आहे का? असा प्रश्न आमदार राजू पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आमची तयारी नेहमीच असते. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत तीस दिवस आधी निवडणूक लढायची आहे असं आम्हाला सांगितलं. त्यामुळे कल्याण ग्रामीणचा अनुभव बघितलाच असेल. आम्ही ही निवडणूक लढणार नव्हतो. याबाबत इतर पक्षांबरोबर आमच्या काही बैठका झाल्या होत्या.”
हेही वाचा >> “५६ वर्षांत मी एकही सुट्टी घेतली नाही”, शरद पवारांचं विधान चर्चेत; म्हणाले, “शेतकरी आपल्या बैलाला…”
आम्ही तयार आहोत
“आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, त्यामुळे आम्हाला सतत तयार असायलाच पाहिजे. मी स्वतः २०१४ ला या जागेवरून लढलो आहे. त्यामुळे मला या लोकसभा मतदारसंघाची बांधणी, धाकणी कशी आहे याबाबत माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आदेश दिला आणि आम्ही तयार नाही, असं व्हायला नको, असं कधी होणार नाही. राज ठाकरेंनी आदेश दिला तर आम्ही तयार आहोत”, असं राजू पाटील यांनी पुढे स्पष्ट केलं.
२०१९ मध्ये राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. परंतु, यंदा २०२४ मध्ये ते निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू झाली आहे. मधल्या काळात ते महायुतीत येण्यासाठीही प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. परंतु, या भेटीत काय ठरलं? हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या बैठकीत काय ठरलं याबाबत पाडवा मेळाव्याला सांगण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबतचे टीझरही मनसेने जाहीर केले आहेत.