राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला विरोध करणारे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे सोमवारी मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंबरोबर विश्वासघात झाला आहे असं त्यांनी म्हटलं. तसंच ते पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत असा आशीर्वादही दिला. त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर आता संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय म्हणाले होते?

“आम्ही हिंदू धर्म, सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. आपल्या धर्मात पाप आणि पुण्य ही संकल्पना मांडली आहे. पापामध्ये घात ही संकल्पना आहे. तर विश्वासघात हा सर्वात मोठा घात असल्याचे बोलले गेले आहे. उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झालेला आहे. याचे दुःख अनेक लोकांच्या मनात आहे. उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर आज मी मातोश्रीवर आलो. आम्हीही त्यांच्याबरोबर झालेल्या विश्वासघातासाठी सहवेदना व्यक्त केल्या. जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसत नाही. तोपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही”, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली होती. याबाबत ज्या प्रतिक्रिया आल्या त्याबाबत संजय राऊत यांनी भाष्य केलं.

हे पण वाचा- शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य, “नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत, पण…”

काय म्हणाले संजय राऊत?

“शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे मुंबईत होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी सोमवारी मातोश्रीला भेट दिली. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वास्तूत येण्याची त्यांची इच्छा होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही त्यांना भेटायचं होतं. शंकराचार्य त्यांच्या शिष्यांसह मातोश्रीवर आले. मातोश्रीवर त्यांचं हिंदू रिती रिवाजांनुसार स्वागत करण्यात आलं. धार्मिक शिष्टाचारानुसार शंकराचार्य यांचं स्वागत केलं. त्यांनी उद्धव ठाकरे, त्यांच्या कुटुंबाला आणि शिवसेनेला आशीर्वाद दिले. त्यानंतर आमच्याशी चर्चाही केली.”

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद मुंबई दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिला.

शंकराचार्यांनी उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिला तर त्यात चूक काय?

मीडियाला त्यांनी सांगितलं की “उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करण्यात आला. हिंदू धर्मात विश्वासघात आणि फसवणुकीला स्थान नाही असं ते म्हणाले. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदावरुन दूर केलं गेलं, त्यांचा पक्ष फोडण्यात आला हे विश्वासघाताने झालं हे शंकराचार्य सांगत आहेत. याबाबत काही लोकांच्या मनात पोटशूळ उठला असेल, त्यामुळे त्यांनी टीका केली. याचा अर्थ असा आहे की त्यांना हिंदुत्व, शंकराचार्यांची भूमिका मान्य नाही. शंकराचार्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, ज्या योग्य भावना आहेत. शंकराचार्यांनाही तुम्ही खोटं ठरवणार असाल तर मला आश्चर्य वाटणार नाही. याच शंकराचार्यांसमोर वाकून नरेंद्र मोदींनी नमस्कार केला. त्यांनी आशीर्वादही दिला. असाच आशीर्वाद त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला, तर त्यात चुकीचं काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.