शरद पवार यांनी जर उद्धव ठाकरेंची साथ सोडली तर आत्तापेक्षा वाईट परिस्थिती त्यांची होईल असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. एवढंच नाही तर आमची साथ सोडू नका हे सांगण्यासाठीच उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानी गेले होते तिथे त्यांनी शरद पवारांचे पाय धरले आणि त्यांना विनवणी केली अशी टीकाही रवी राणांनी केली आहे. आदित्य ठाकरेंनी जो गौप्यस्फोट केला की एकनाथ शिंदे हे घरी येऊन रडले होते त्यावर प्रतिक्रिया विचारली असता रवी राणांनी हे उत्तर दिलं आहे.
काय म्हटलं आहे रवी राणा यांनी?
“आदित्य ठाकरे हे बालिशपणे वक्तव्य करत आहेत. एखादा माणूस हताश, निराश होतो तेव्हा असं बोलतो. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघंही निराश आहेत. त्यांना हेदेखील समजलं आहे की शरद पवारही त्यांची साथ सोडतील. त्यामुळेच आता एकनाथ शिंदेंवर आरोप केला.” असं रवी राणांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी पवारांच्या पायावर डोकं टेकलं
“उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे शरद पवार यांच्या घरी गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी शरद पवारांचे पाय धरले. आम्हाला या संकटात सोडून जाऊ नका अशी विनवणी त्यांनी केली. या संकटात शरद पवारांनी जर उद्धव ठाकरेंची साथ सोडली तर आज आहे त्यापेक्षा वाईट अवस्था उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची होणार आहे. त्यामुळे रडायची वेळ आणि शरद पवारांच्या पायावर डोकं ठेवायची वेळ ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आली आहे. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन होताना सांगितलं होतं की शिवसैनिक मुख्यमंत्री होईल आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले. मला वाटतं कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला असता तर मविआमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. पण उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डावलून स्वतः मुख्यमंत्रीपद मिळवलं हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. बाळासाहेबांना वचन दिलं होतं की शिवसैनिक मुख्यमंत्री होईल. मात्र उद्धव ठाकरे हे अत्यंत स्वार्थी आहेत म्हणूनच ते मुख्यमंत्री झाले” असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं होतं?
गद्दारी करण्याआधी एकनाथ शिंदे हे आमच्या घरी आले होते आणि मला भाजपासोबत जावं लागेल असं म्हणत माझ्या वडिलांकडे म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे रडले होते. असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. तसंच सगळे जण आपल्या स्वार्थासाठी निघून गेले असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरेंवर टीका होते आहे. आता रवी राणा यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.