Prakash Solanke: महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांचं राजकारण आपण कायमच पाहिलं आहे. त्यातलं नुकतंच समोर आलेलं उदाहरण म्हणजे शरद पवार आणि अजित पवार. शरद पवारांनी पक्षाच्या चाव्या त्यांच्याकडेच ठेवल्याने अजित पवार नाराज झाले. २ जुलै २०२३ ला त्यांनी काका शरद पवार यांच्याविरोधात बंड करत थेट सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काय काय घडामोडी घडल्या ते महाराष्ट्राने पाहिलं आहे. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांनी जर वेळीच अजित पवारांकडे पक्ष सोपवला असता तर त्यांचं घर फुटलं नसतं असं त्यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवारांवर कुणी टीका केली आहे?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके ( Prakash Solanke ) यांनी थेट शरद पवारांबाबत भाष्य केलं आहे. प्रकाश सोळंके ( Prakash Solanke ) हे चार ते पाच दशकांपासून राजकारणात आहेत. प्रकाश सोळंके ( Prakash Solanke ) यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर त्यांनी त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके हेच माझे राजकीय वारसदार असतील असं म्हटलं आहे. या घोषणेनंतर त्यांनी शरद पवारांवर टीका केली.

शरद पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी टीका केली आहे. (संग्रहित छायाचित्र)

काय म्हणाले प्रकाश सोळंके

“मी पाच वर्षांपूर्वीच हे जाहीर केलं होतं की माझा राजकीय वारसा जयसिंह साळुंके पुढे चालवतील. राजकारण मोठ्या माणसाने कुठे थांबायचं हे ठरवलं पाहिजे. शरद पवार हे पण जर वेळीच थांबले असते तर त्यांचं घर फुटलं नसतं. त्यांच्या घरात जे घडलं ते घडलं नसतं. यावेळी लोकसभा निवडणुकीत जे घडलं ते मी आयुष्यात पाहिलं नव्हतं. मला दोन मुलं आहेत, एक मुलगी आहे. मात्र त्यांना राजकारणात रस नाही. राजकीय वारस म्हणून माझा चॉईस माझा पुतण्या जयसिंह हाच होता. त्यामुळे मी त्याचं नाव जाहीर केलं.” असं प्रकाश सोळंके ( Prakash Solanke ) म्हणाले. आज त्यांनी ही घोषणा केल्यानंतर एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

हे पण वाचा- Raj Thackeray : “महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती करायला शरद पवारांनी हातभार लावू नये”, राज ठाकरेंची खोचक टीका!

जयसिंह सोळंके हे नेमके कोण आहेत?

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके ( Prakash Solanke ) यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे जयसिंह सोळंके हे चिरंजीव आहेत. म्हणजेच, प्रकाश सोळंके ( Prakash Solanke ) यांचे पुतणे. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता जयसिंह सोळंके हेच प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If sharad pawar takes right decision about ajit pawar then his house was not broke said ncp leader scj