मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उर्वरित अनेक आमदार त्यांच्या गटात सामील झाले आहेत. असं असलं तरी बंडखोर आमदार आम्ही शिवसेनेतच आहोत, असा दावा करत आहेत. अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी बंडखोर आमदारांना ‘गद्दार’ म्हणून हिनवत आहेत. याच मुद्द्यावरून बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुम्हाला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा, असं आवाहन संतोष बांगर यांनी उपस्थित शिवसैनिकांना केलं आहे. ते हिंगोली येथील एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “आपण शिवसैनिक आहोत. जर आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी करावं. आम्ही भिणारे शिवसैनिक नाहीत. आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीयेत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला जर कुणी आरे म्हटलं तर त्याला कारे नाही, पण कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही, असे आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, हे ध्यानात ठेवा” असा धमकीवजा इशारा बांगर यांनी दिला आहे.

हेही वाचा- चालू पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी केली एकनाथ शिंदेंच्या कानात कुजबूज, VIDEO व्हायरल

खरंतर, बंडखोरी झाल्यानंतर सुरुवातीला संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. बंडखोरी झाल्याची बातमी समजल्यानंतर बांगर यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियात ‘निष्ठेचा नांगर, संतोष बांगर’ अशी मोहीम देखील पाहायला मिळाली होती.

हेही वाचा- “बंडखोरांच्या पार्श्वभागावर दांड्याचे फटके मारा” म्हणणाऱ्या शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील, १५ दिवसांतच घेतला यू-टर्न

पण यानंतर अवघ्या काही दिवसांत संतोष बांगर यांनी आपल्या विधानापासून यू-टर्न घेत शिंदे गटात सामील झाले. शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून बंडखोर आमदारांना गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढण्याचं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If someone calls us betrayer then you should slap them statement by rebel mla sanjay bangar rmm