जहाल नक्षलवादी शेखरचे लोकसत्ताजवळ मनोगत
दुर्गम भागात रोजगाराच्या वाढलेल्या संधी, नरेगामुळे स्थानिकांना मिळणारा हक्काचा रोजगार, या बाबींमुळे चळवळीची वाढ खुंटली असून अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांना नैराश्याने ग्रासले आहे. अशा स्थितीत शासनाने आत्मसमर्पणाची योजना अधिक आकर्षक केली तर अनेकजण या चळवळीतून बाहेर पडू शकतात, असे मत नुकताच शरण आलेला जहाल नक्षलवादी शेखरने लोकसत्ताजवळ व्यक्त केले. काँग्रेसचे नेते बहादूरशाह आलामांना ठार मारण्यास आपण विरोध केला होता, असेही तो यावेळी म्हणाला.
सलग २४ वर्षे नक्षलवादी चळवळीत काढल्यानंतर शेखर काही दिवसांपूर्वी आंध्र पोलिसांसमोर शरण आला. गेली ६ वर्षे दक्षिण गडचिरोलीचे प्रमुखपद सांभाळणाऱ्या शेखरला पोलिसांनी सध्या गडचिरोलीत आणले आहे. यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना त्याने या चळवळीच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. सोबतच अनेक गुन्ह्य़ात आपण सहभागीच नव्हतो, असे सांगत हातही झटकले. दंडकारण्य क्षेत्रातील दुर्गम भाग हीच आजवर चळवळीची ताकत राहिली होती. आता या दुर्गम भागात शासनाने अनेक कामे सुरू केली आहेत. रस्त्यांची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. शिवाय, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. अशा स्थितीत स्थानिक आदिवासी चळवळीत यायला तयार नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. यामुळे चळवळीची वाढ खुंटली आहे. या शिवाय, सुरक्षा दलांच्या ग्रीन हंट मोहिमेमुळे जवानांचा वावर दुर्गम भागात वाढला आहे. त्यामुळे संघटनेच्या हालचाली मंदावल्या आहेत. आधी दलममध्ये १५ ते २० सदस्य असायचे. आता ही संख्या दहावर आली आहे. या सर्व प्रकारामुळे वरिष्ठांच्या वर्तुळात सुद्धा चिंतेचे वातावरण आहे. अशाही स्थितीत आणखी हिंसक कारवाया करा, असे निर्देश वरिष्ठ सातत्याने देत असतात. प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रात काम करणारा नक्षलवादी यामुळे आणखी अडचणीत आला आहे. अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे. अशा स्थितीत सरकारने आत्मसमर्पणाची योजना अधिक आकर्षक केली तर अनेक सहकारी चळवळीबाहेर येऊ शकतात, असे तो म्हणाला.
चळवळीला मनुष्यबळाचा अभाव जाणवत असला तरी आता पैसा मात्र चांगला मिळू लागला आहे. दक्षिण गडचिरोलीत तेंदू पानाच्या हंगामात खंडणी गोळा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या शेखरने दरवर्षी आपण २ कोटी रुपये गोळा करत होतो, असे यावेळी सांगितले. बांबूच्या व्यवसायातून खंडणी गोळा करण्याची जबाबदारी दंडकारण्य स्पेशल झोन समितीकडे असते, अशी माहिती त्यांनी दिली. २००९ मध्ये झालेल्या लाहेरीच्या चकमकीत सहभागी होतो, अशी कबुली देणाऱ्या शेखरने या चकमकीत केवळ एक नक्षलवादी ठार झाला होता व काही जण जखमी झाले होते. या जखमी सदस्यांवर चळवळीत सोबत असलेल्या छत्तीसगडमधील राजेश नावाच्या डॉक्टरने उपचार केले होते. जखमी सदस्यांची देखभाल करण्याची जबाबदारी याच डॉक्टरवर आहे. हा डॉक्टर दूर ठिकाणी असेल तर मग स्थानिक डॉक्टरांना बोलावले जाते, अशी माहिती शेखरने दिली.
गडचिरोलीत असतानाच्या काळात मी स्वत: बारा खबऱ्यांची हत्या केली. चळवळीत जनतेशी चर्चा करूनच खबरे कोण, याचा निर्णय घेतला जातो. तरीही एखादा निरपराध मारला गेला तर आम्ही माफी मागतो, असे शेखर म्हणाला.
भामरागडचे काँग्रेसचे नेते बहादूरशाह आलाम यांना ठार मारण्यास आपण विरोध केला होता, मात्र दंडकारण्य स्पेशल झोन समितीने त्यांची हत्या करण्याचा ठराव केला असल्याने काहीही करू शकलो नाही. त्याला ठार मारण्याची कामगिरी पिपली बुर्गी या गावातून चळवळीत दाखल झालेल्या युवकांवर देण्यात आली होती, अशी माहिती शेखरने दिली. या चळवळीवर आरंभापासून तेलगू भाषिकांचा पगडा आहे, हे त्याने मान्य केले.
२४ वर्षांंपूर्वी करीमनगर जिल्ह्य़ातील मच्छीपेठा या माझ्य़ा गावातील जमीनदारांवर आरोप करून आपण चळवळीत प्रवेश केला. आता आत्मसमर्पणानंतर पुन्हा गावात गेलो तेव्हा हेच जमीनदार मला भेटायला आले व त्यांनी गावात परत आला म्हणून माझे स्वागतही केले, असे शेखरने यावेळी सांगितले.
आत्मसमर्पण योजना अधिक आकर्षक केल्यास अनेक नक्षलवादी बाहेर पडणे शक्य
दुर्गम भागात रोजगाराच्या वाढलेल्या संधी, नरेगामुळे स्थानिकांना मिळणारा हक्काचा रोजगार, या बाबींमुळे चळवळीची वाढ खुंटली असून अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांना नैराश्याने ग्रासले आहे. अशा स्थितीत शासनाने आत्मसमर्पणाची योजना अधिक आकर्षक केली तर अनेकजण या चळवळीतून बाहेर पडू शकतात, असे मत नुकताच शरण आलेला जहाल नक्षलवादी शेखरने लोकसत्ताजवळ व्यक्त केले. काँग्रेसचे नेते बहादूरशाह आलामांना ठार मारण्यास आपण विरोध केला होता, असेही तो यावेळी म्हणाला.
आणखी वाचा
First published on: 09-02-2013 at 04:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If surrender policy is make attractive then naxalites can surrender