नाणार येथील हरित तेलशुद्धीकरण प्रकल्प गेली सात वर्षे चर्चेत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाणार प्रकल्पाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. “सर्वनाश होऊन नाणार प्रकल्प होणार असेल तर, काँग्रेस त्याला विरोध करेल.” असं पटोले यांनी जाहीर भाषणात सांगितलं आहे.
“मी जेव्हा विधानसभेचा अध्यक्ष होतो, त्यावेळी माझ्याकडे नाणारला विरोध करणारे आले होते आणि समर्थन करणारे देखील आले होते. नाणार प्रकल्प निर्माण करण्याची ज्यावेळी घोषणा झाली. त्यावेळी गुजरातमधील व्यापारी, उद्योजकांनी तिथल्या लोकांच्या जमिनी घेतल्या. त्यांना वाटत होतं की या प्रकल्पामुळे या जमिनींचे भाव आम्हाला दहा पटीने वाढून मिळतील. म्हणून त्यांचा आग्रह जास्त होता. आम्ही जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडून तपशील मागवला. तेव्हा वस्तूस्थिती देखील तीच निघाली,की बाहेरच्या लोकांनी तिथे जमिनी घेतल्या आणि त्यावर पैसा कमवण्याच्या उद्देशाने तिथे नाणार प्रकल्प झाला पाहिजे, असं म्हणायला लागले. नाणार होणार परंतु कुठल्या आधारावर होणार हे काय मी बोललो नव्हतो. सर्वनाश होऊन नाणार प्रकल्प होणार असेल तर, आम्ही त्याला विरोध करू, आमचे नेते राहुल गांधींनी पण विरोध केला होता.” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
“…तर उदय सामंतांना जाळून टाकू” नाना पटोलेंसमोर भाषण करताना रिफायनरी विरोधकाचं खळबळजनक विधान
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी कोकणातील राजापूर दौऱ्यावर होते. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते नरेंद्र जोशी यांनी नाना पटोले आणि पोलीस प्रशासनासमोर उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी दिली आहे. नाना पटोले यांच्यासमोरच संबंधित नेत्यानं प्रक्षोभक भाषण केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.