शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सचिन अहिर यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिन अहिर यांनी सांगितले की, “पूर्व अधिवेशनाच्या अगोदर काय विषय घेतले पाहिजेत, काय चर्चा झाली पाहिजे. या अनुषंगाने आजची बैठक पार पडली. गटनेते अनिल परब, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विधानपरिषदेचे आम्ही सर्व लोकप्रतिनिधींची ही बैठक झाली. लवकरच विधानसभेचीही बैठक होणार आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्रातुन बाहेर गेले, ओला दुष्काळ जाहिर व्हायला पाहिजे आणि असे इतर प्रश्नांवर आजची बैठक पार पडली. उद्या दुपारी १२ वाजता विरोधी पक्ष नेत्यांची संयुक्त अशी बैठक होणार आहे.”
“या सरकारमध्ये कुठेतरी अंतर्गत नाराजी आहे. ज्या आशा निर्माण केल्या गेल्या आहेत, त्या जोरावर लोकांनी सत्तांतर केलेलं आहे हे सिद्ध होतय. आज पाच महिने उलटूनही दुर्दैवाने राज्य मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार होत नाही. आताही सांगण्यात आलं आहे की अधिवेशनाच्या अगोदरही होईल. अधिवेश आल्यानंतर म्हणतात की अधिवेशनानंतर होईल. मग सांगतील की नवीन वर्षात होईल, मग परत पुढचं अधिवेशन येईल. “राज्य सरकारला जर वाटत असेल की आम्ही कायदेशीर सत्तेमध्ये आहोत, तर त्यांनी लवकरात लवकर मंत्रीमंडळ जाहीर केलं पाहिजे.” असं सचिन अहिर यांनी म्हटलं.
याचबरोबर “अनेक प्रश्न आहेत. राज्य मंत्र्यांच्या माध्यमातून असेल, विधीमंडळात जे अधिवेशनात येणार आहेत. एकाएका मंत्र्याकडे एवढी खाती आल्यानंतर त्या त्या खात्याला आज ते न्याय देऊ शकणार नाहीत. म्हणून तर ही एवढ्या संख्येच्या मंत्रिमंडळाची संकल्पना आलेली आहे.” असं अहिर यांनी सांगितलं.
याशिवाय “ते जर सक्षमपणे सांगत असतील की आम्ही सरकार चालवू शकतो, तर त्यांनी जाहीर तरी करावं की आमचं मंत्रीमंडळ हे एवढच असणार आहे, आमच्याकडे मंत्रीमंडळ वाढणार नाही. ही वस्तूस्थिती आहे म्हणून नाराजीचा सूर एकाबाजूला ४० आमदारांमध्ये आहे. त्यापेक्षा जे १०५ भाजपाचे आमदार आहेत, ते तर सांगत आहेत की ही सत्ता नेमकी कोणासाठी आहे, ही एक चर्चा आता पुढच्या काळात पाहायला मिळेल.” असं म्हण त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे सांगितले.