ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवनानिमित्त संजय राऊत यांनी ‘आवाज कोणाचा’ पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरे देताना भाजपाच्या कुटनीतीवर टीका केली. तसंच, “शिवसेनेने पाठित खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली असे म्हणणारे राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं म्हणून राष्ट्रवादी फोडली”, असा सणसणीत सवालही ठाकरेंनी या मुलाखतीत उपस्थित केला.
“शिवसेनेने खंजीर खुपसला मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होत? शिवसेना फोडून ४० आमदार आल्यानंतर, संख्याबळ असतानाही राष्ट्रवादी का फोडलीत? ते फोडण्याआधी चार ते पाच दिवस आधी पंतप्रधानांनीचआरोप केले होते. त्या आरोपांचे आता काय झाले, त्या घाटोळ्याच्या पैशांचं काय झालं, कशासाठी ही फोडाफोडी केलीत, म्हणूनच म्हटलं एवढा भ्रष्टाचारी राष्ट्रवादी पक्ष आहे किंवा होता तर त्यांनी नेमकी तुमच्याशी काय गद्दारी केली होती की त्यांना तुम्ही फोडलंत”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
हेही वाचा >> “कुणाच्या लग्नापुरता…” समान नागरी कायद्यावरून उद्धव ठाकरेंनी मांडले परखड मत
“पण त्यावर भाजपचं असं म्हणणं आहे की, राष्ट्रवादीशी जी त्यांनी युती केली म्हणा किंवा पक्ष फोडला म्हणा, ती आमची कूटनीती आहे, अधर्म नाही”, असं संजय राऊत म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “ही कूटनीती आहे की आधीपासूनची मेतकूट नीती आहे हे माहीत नाही मला, पण या कूटनीतीला आता कुटून टाकण्याची वेळ आली आहे. सत्तालोलुपता, सत्ताभक्षक हाच शब्द मला योग्य वाटतो. जसा नरभक्षक असतो. तसे हे सत्ताभक्षक! हे एकदा का सत्तेला चटावले की त्यांना काही दिसेनासे होऊन जाते. ती सत्तालोलुपता या सत्ताधाऱ्यांमध्ये आलेली आहे. त्यांना माणसं दिसेनाशी झाली आहेत. महिलांवरील अत्याचार दिसेनासे झाले आहेत. वाढती महागाई वगैरे तर बोलूच नका. हे विषय तर त्यांच्या लेखी काहीच नाहीयत आणि एका खोट्या भ्रमात सत्ता चालवताहेत”, असं ठाकरे म्हणाले.
“एक गंमत बघा, ज्यांच्यावर पंतप्रधानांनी ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. मग आरोप खरे की अजित पवार खरे?”, असा प्रश्नही ठाकरेंनी विचारला.
हेही वाचा >> “सध्याच्या सगळ्या भोंदूगिरीत या माणसाकडून…”, उद्धव ठाकरेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं
आज महाराष्ट्रामध्ये आवाज कुणाचा आहे?
“वेगळं सांगण्याची गरज नाहीय. ज्या घडामोडी घडताहेत त्याबद्दल बोलायचं तर ज्यांनी या घडामोडी घडवल्या त्यांचा घडा आता मोडीत निघायला आलेला आहे. एक नवीन महाराष्ट्र उभा राहतोय आणि हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा या घडामोडींना सुरुवात झाली त्याच वेळी मी म्हटलं होतं की, सडलेली पानं पडलीच पाहिजेत. ती पानं पडल्यानंतर नवीन अंकुर निघतात. कोंब फुटतात आणि वृक्ष पुन्हा ताजातवाना, टवटवीत पानांनी-फुलांनी बहरून जातो. आज तीच अवस्था शिवसेनेची आहे. सडलेली पानं आता झडलेली आहेत. नवीन कोंब फुटलेले आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.