विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज(बुधवार) पत्रकारपरिषदेत बोलताना शिंदे गटातील आमदरांवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे गटातील आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत, या पार्श्वभूमीवर बोलताना दानवे यांनी शिंदे गटातील आमदारांना टोला लगावला आहे.
अंबादास दानवे म्हणाले, “मला असं वाटतं वीर सावरकर असो किंवा शिवसेनाप्रमुख असो यांचं हिंदुत्व भाजपा जे शिवसेनेतून ४० गद्दार फुटले त्यांना सांगत असेल, तर मला वाटतं हेच हास्यास्पद आहे. तुम्ही ४० जण शिवसेनेत होता, शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशा देणारं आहे. या देशात हिंदू म्हणून सन्मानाने जगायला, हिंदू म्हणून मतदान करायला जर कोणी शिकवलं असेल तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं. एवढं हिंदुत्वाचं आपल्याला बाळकडू मिळालेलं असताना, भाजपाच्या नेत्यांकडून हे जर हिंदुत्वाचे धडे घेत असतील तर मला वाटतं यापेक्षा मोठं दुर्दैवं कोणतही नाही.”
याशिवाय “बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर कोणी प्रणाम करण्यासाठी येत असेल तर त्याचे स्वागतच आहे. परंतु ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारना केली आहे. ज्या लोकांनी बाळासाहेबांची शिवसेना गद्दारी करून तोडली आहे. ज्या भाजपाने बाळासाहेब, उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, ते गद्दार लोक आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन प्रणाम करत आहेत. केलापण पाहिजे परंतु हे लोक दाखवण्यासाठी हे करत आहेत. यांनी बाळासाहेबांचा विचार, संघटना तोडली आहे.” असंही दानवेंनी म्हटलं आहे.