सातारा: कार्यकर्ता हा माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. मतदारसंघातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. भाजपाचा आधार घेऊन माझ्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा, दबावाचा प्रयत्न करून खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात डांबले जात आहे. ही परिस्थिती आता सहन करण्यापलीकडे गेली आहे. पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या अपक्ष लढू, असे खुले आव्हान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.

खटकेवस्ती (ता. फलटण) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व कार्यकर्ता मेळावा झाला. त्यावेळी आमदार रामराजे बोलत होते. या वेळी आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, ज्येष्ठ नेते नाईक महादेव पवार यांच्यासह राजे गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध गावचे सरपंच, कार्यकर्ते यांची या वेळी उपस्थिती होती.

हेही वाचा – पालकमंत्री सुरेश खाडे यांचे सहकारी प्रा. मोहन वनखंडे काँग्रेसमध्ये

एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात रामराजे बोलत होते. आजच्या सभेमध्ये फक्त जो विषय अजेंड्यावर नाही, तो राज्यावर कसा गेला याचा शोध घेतला पाहिजे. आज तुम्ही अजित पवारांना सोडून चाललाय का असा प्रश्न मला अनेकांनी केला. राज्यातील माध्यमातून माझ्याकडे चौकशी झाली. त्यावर बरीच चर्चा झाली. ही चर्चा सर्वत्र पसरली; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता ते म्हणाले परंतु कदाचित ही बातमी विरोधकांनीच दिली असावी. कारण त्यांना असल्या अफवा पसरवण्याची घाणेरडी सवय आहे. जर महायुतीतून रामराजांची ब्याद गेली, तर कमळाच्या चिन्हावर उभे राहण्यास आम्ही मोकळे असे त्यांना वाटत असेल. त्यांनी भाजपाचा आधार घेऊन पोलीस प्रशासनाला बरोबर धरून माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्याचा उद्योग सुरू केला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे, जर त्यांना निवडणुकीची एवढीच खुमखुमी असेल तर पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या अपक्ष लढू, असे खुले आव्हान आमदार रामराजे यांनी विरोधक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.

रामराजे म्हणाले, आपल्या कार्यकर्त्यांवर वारंवार येत असलेल्या दबावामुळे आज त्यांच्या भावना तीव्र आहेत. या त्यांच्या भावना आपण अजित पवारांच्या समोर मांडणार आहोत. ते योग्य निर्णय घेतील. आजवर मी सांगत होतो, ते कार्यकर्ते ऐकत होते; परंतु आता कार्यकर्ते मला सांगत आहेत. हा मोठा ऐतिहासिक क्षण आहे. जर कार्यकर्त्यांनी काही ठरवलेच तर मी काही बोलू शकणार नाही, अशी वेळ पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी माझ्यावर येऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा – नवी मुंबई ते बंगळूरू दरम्यान विमान उतरण्याची सुविधा असलेला महामार्ग; नितीन गडकरी यांची घोषणा

कार्यकर्त्यांची सुरक्षितता व विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण शरद पवार यांना दुखवून अजित पवारांकडे गेलो. फलटण तालुक्याच्या इतिहासामध्ये आजवर चौथ्यांदा आमदारकीची संधी कोणालाही मिळालेली नाही. ती आम्ही आणि अजित पवारांनी दीपक चव्हाण यांना दिली आहे. ते कुठूनही उभे राहिले तरी भरघोस मतांनी निवडून येतील, त्यांनी मतदारसंघाची संस्कृती जपावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संजीव राजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण आदींची भाषणे झाली, यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या.