Jalna News Today, OBC Sabha Updates : एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांसह सकल मराठा समाजाने मागणी लावून धरलेली असताना आता ओबीसी समाजही आक्रमक आहे. मराठ्यांना ओबीसीतील आरक्षण देऊ नये याकरता ओबीसींनी आंदोलन छेडलं आहे. मनोज जरांगे पाटलांचा राज्यभर दौरा सुरू असताना आज जालन्यातही ओबीसींची विराट सभा झाली. या आरक्षण बचाव एल्गार सभेला राज्यभरातील सर्वपक्षीय ओबीसी नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जमलेल्या ओबीसी जनसमुदायाला संबोधित केलं.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, “भर उन्हात पिवळं वादळ आलंय. अनेकांना पिवळं केल्याशिवाय सोडणार नाही अशाप्रकारचं हे वादळ आलं आहे. उपस्थित बांधव आणि भगिनींनो आजची ही सभा ओबीसीच्या हक्काला धक्का लावण्याची हिंमत यापुढे कोणाची होणार नाही, अशी ऐतिहासिक सभा आहे. सवाल इस बात का नही शिसा तुटा है की बचा है, सवाल इस बात का है की पत्थर किस तरफ से आया है. जर ओबीसीच्या हक्कासाठी आम्ही लढत असू तर आम्हाला धमकी द्याल तर आम्ही आमच्या पदापेक्षा आमच्या समाजासाठी लढू. पद महत्त्वाचं नाही तर समाज महत्त्वाचा आहे. सत्ता बदलत राहते, कोणासोबत जगायचं हे महत्त्वाचं आहे.

“या ३५० जातीच्या समूहाची पिढ्यान पिढ्यांची जमीन कमी झाली, माझी लेकरं गरीब झाले म्हणून सांगत आहेत. तुमच्या जमिनी पिढीजात कमी झाल्या असतील, पण पिढ्यानपिढ्या ज्याच्याकडे जमिनी नाहीत त्याची व्यथा काय असेल याचा विचार तुम्ही करा. २०-५० एकरचा शेतकरी आज पाच एकरवर आला असेल, पण ज्याच्याकडे दोन एकरही नाही तो वीस पिढ्यांतही कुठे असेल याचा विचार तुम्ही करणार नाही? तुम्ही स्वतःला मोठा भाऊ म्हणता. मोठ्या भावाने मोठ्या भावासारखं वागलं पाहिजे. लहान भावाच्या ताटातलं काढायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमची जागा दिसल्याशिवाय राहणार नाही”, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.

तुम्हाला जर ठरवायचं असेल तर आपण सर्व मिळून या देशाच्या पंतप्रधानांना विनंती करायला जाऊ आणि सांगू एकदा जातनिहाय जनगणना करून टाका. आणि मग तुम्हाला कळेल की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. हे तुम्हाला करावं लागेल. तुम्ही हे कराल तर दुधचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल हे विश्वासाने सांगतोय, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

“या ओबीसींच्या एल्गार सभेला लाखोंचा समुदाय अजिबात उन्हा-तान्हाची पर्वा न करता येथे आलाय. तुम्ही आलात, तुमच्या हक्काचं संरक्षण करण्याकरता आलात. तुम्ही आलात तुमच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावता कामा नयेत, म्हणून तुम्ही आलात. आमच्या जीवात जीव असेपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, असंही आश्वासन त्यांनी दिलं.

“लेकराचं नाव घेऊन लोकांना बनवून नका रे. इकडे काय बकरं आहेत का कापून खाण्यासाठी. तुमच्या सर्वांच्या वेदना तुमच्या सर्वांच्या दुःखाची जाणीव झाल्यामुळे आज या ठिकाणी सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. इथं पक्षाचा विषय नाही, कोणी काय केलं त्याचा विषय नाही. जो ओबीसी की बात करेगा वोही आपके दिल मे रहेगा. इथं सांगणार अमुक तमुकाने केलं, पण ज्यावेळी भीतीचं वातावरणं तयार होतं, दहशत, भीती, घाबरून सोडलं होतं, त्यावेळी कोण वाघ रस्त्यावर आले त्यांचा विचार करा. स्वतःचं घर जळत असातना संपूर्ण गाव वाचवा तरच आपलं घर वाचेल ही हिंमत येऊद्यात. बीडमध्ये राऊतांचं घर जाळलं, चार कोटींची मालमत्ता उद्ध्वस्त जाळून टाकलं. इतका ओबीसी द्वेष तुमच्यात आला कुठून”, असंही ते म्हणाले.

Story img Loader