गेल्या वर्षभरापासून राज्यात वेगाने नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राजकीय नाट्याचे विविध अंक महाराष्ट्रासमोर सादर होत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. २ मे रोजी झालेल्या या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला. अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा होताच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी भावूक झाले. यावरून अनेकांनी शरद पवारांची समजूत काढली. त्यांनी निवृत्त होऊ नये, अशी विनंती होऊ लागली. मात्र, शरद पवारांच्या याच निर्णयावर अजित पवारांनी आता थेट हल्लाबोल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोक माझा सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. भाषण संपता संपता त्यांनी ही धक्कादाक घोषणा केली. त्यामुळे कार्यक्रमातील उपस्थित कार्यकर्ते भावूक झाले होते. लागलीच सगळे व्यासपीठावर जमले. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह व्यासपीठावर उपस्थित असलेले अनेक नेतेही भावूक झाले. शरद पवारांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी होऊ लागली. त्यावेळी त्यांनी एक समिती गठीत केली. ही समिती पुढचा अध्यक्ष ठरवेल असं ठरवलं गेलं. परंतु, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या हट्टापुढे शरद पवारांना नमतं घ्यावं लागलं आणि अध्यक्ष पदाच्या निवृत्तीचा विचार मागे घ्यावा लागला.

शरद पवारांनी निर्णय मागे घेताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली. या सर्व प्रकरणांवरून बंडखोरी केलेल्या अजित पवारांनी हल्लाबोल केला आहे. “राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला?” असा थेट सवालच त्यांनी भर कार्यक्रमात विचारला आहे. त्यामुळे त्यांच्या मनात एवढे दिवस असलेली खदखद आज बाहेर पडली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

“मला हे सांगण्यात आलं की मी राजीनामा देतो, संस्था बघतो. त्यानंतर एक कमिटी करतो, त्या कमिटीत तुम्ही सगळे प्रमुख बसा. ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा सांगितलं त्यालाही आम्ही तयार झालो. त्यानंतर दोन दिवसांत काय घडलं कुणास ठाऊक? त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला?”, असं अजित पवार म्हणाले.