सोलापूरमध्ये पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी रमजान महिन्यात रोजे करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करून इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. यावेळी सर्वच मुलांच्या चेहऱ्यावर या इफ्तार पार्टीचा आनंद दिसत होता. रमजान महिन्यात अनेक संस्था, संघटना रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात. त्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापार, उद्योग आदी विविध क्षेत्रातील मंडळींचा सहभाग असतो. अशा कार्यक्रमात सामाजिक सलोखा, बंधुभावाचा संदेश दिला जातो.
बहुतांशी ठिकाणी होणाऱ्या रोजा इफ्तार पार्टीत राजकीय नेत्यांचा वावर आणि प्रभाव अधिक असतो. परंतु पोलीस आयुक्त बैजल यांनी प्रथमच खास शालेय मुलांसाठी आपल्या निवासस्थानी रोजा इफ्तार पार्टी आयोजित केली होती.
पोलीस आयुक्त बैजल यांच्या निवासस्थानाच्या आवारात यापूर्वीच पक्षीघर उभारण्यात आले आहे. हे पक्षीघर पाहण्यासाठी आणि पक्षांचे जवळून निरीक्षण करण्यासाठी शालेय मुले येतात. दोन दिवसांपूर्वी सोलापूर सोशल उर्दू प्राथमिक शाळेची मुले पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी पक्षीघर पाहण्यासाठी आली होती. त्यावेळी स्वतः पोलीस आयुक्त बैजल मुलांमध्ये रमले.
यापैकी बहुतांशी मुले रमजान महिन्यात रोजे करीत असल्याचे समजल्यानंतर या मुलांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आमंत्रण बैजल यांनी दिले. त्यानुसार शुक्रवारी (२९ एप्रिल) सायंकाळी ठरलेल्या वेळी ही चिमुकली मुले आली. सोबत शाळेचे मुख्याध्यापक आसीफ इक्बाल व शिक्षकांचा चमू होता.
“जगातील प्रत्येक माणसाला न्याय देणे हेच खरे राष्ट्रप्रेम”
मुख्याध्यापक आसीफ इक्बाल म्हणाले, “सर्वत्र थोरामोठ्यांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. परंतु पोलीस आयुक्त बैजल यांनी लहान मुलांसाठी इफ्तारचे आयोजन केले ही बाब प्रेरणादायक आणि आश्वासक आहे.” यावेळी पोलीस आयुक्त बैजल यांनी “प्रत्येक धर्माचा सन्मान करणे आणि जगातील प्रत्येक माणसाला न्याय देणे हेच खरे राष्ट्रप्रेम आहे. मुले तर खरी राष्ट्र संपत्ती आहे,” असे विचार मांडले.
समीर सय्यद यांनी यावेळी भावपूर्ण शब्दांत दुआ केली. पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, बापू बांगर आदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चिमुरड्या मुलांचा अगत्याने पाहुणचार केला. शेवटी पोलीस आयुक्त निवासस्थानातून स्नेह आणि प्रेमाचा संदेशासह निरोप घेताना मुले भारावलेली दिसली.