राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ता ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांत वाढ
महामार्गावरील प्रवासी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवरील दुर्लक्षिततेमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हे अपघात होत असल्याचा आरोप महामार्गस्थित हालोली पाटील पाडा ग्रामस्थांसह प्रवासी व वाहनचालक यांनी केला आहे.
हालोली ग्रामपंचायत हद्दीतील पाटील पाडा हा मुंबई-अहमदाबाद महामार्गास्थित असून महामार्ग भूसंपादन प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे रस्ता चौपदरीच राहिला आहे. वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. महामार्गावर पाटील येथे अपघातांची संख्या वाढली आहे. हालोली पाटील पाडा येथे अरुंद महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही त्यामुळे येथील अपघातांचीही संख्या वाढली आहे. हालोली पाटील पाडा येथे महामार्ग अरुंद आहे. तीन मार्गिका असलेला रस्ता दोन मार्गिकांचा होतो. वाहनचालक आणि प्रवाशांना तिसरी मार्गिका संपण्याचा सूचना फलक येथे लावण्यात आलेला नाही. मार्गिका संपल्याच्या ठिकाणी मातीचा ढीग टाकण्यात आला आहे. बुधवारी रात्री भरधाव मोटार या ढिगावर चढल्याने तिचे नियंत्रण सुटले आणि मागून आलेल्या भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेमुळे मोटार दुभाजक ओलांडून गुजरात मार्गिकेवर समोरून येणाऱ्या कंटेनरला जाऊन धडकली. अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला. कंटेनर महामार्गालगतच्या विद्युत वहिनीच्या खांबावर जाऊ न आदळला. त्यामुळे परिसरातील सुमारे वीस गावं अठरा तास अंधारात होती. या ठिकाणी हा ढीग नसता तर हा गंभीर अपघात टळला असता. त्याचप्रमाणे वर्षभरात महामार्गाच्या गुजरात मार्गिकेवर हालोली पाटील पाडा येथे वसईचे हरेंद्र राजभर आणि पावसाळ्यात वाडा तालुक्यातील मलवाडा गावच्या दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला होता. याच ठिकाणी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मातीचा ढीग चुकवताना गौरव सिंग या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. मे महिन्याच्या सुरुवातीला (४ मे) याच ठिकाणी एका नौदल अधिकाऱ्याचे वाहन या मातीच्या ढिगावर चढल्याने वाहन उलटून झालेल्या अपघातात नौदल अधिकारी आलोक उन्याल यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे सहकारी नौदल अधिकारी सुनील गुप्ता आणि पत्नी गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे याठिकाणी प्रशासनामार्फत योग्य त्या उपाययोजनांसाठी आवश्यकता असल्याची मागणी होत आहे.
अपघातांची कारणे
पाटील पाडा येथे महामार्ग अरुंद होत असल्याचा सूचना फलक नसणे.
तिसरी मार्गिका संपण्याच्या ठिकाणी अरुंद रस्त्याबाबतचा तात्पुरता सूचना फलक नेमका अरुंद रस्त्याच्या ठिकाणी लावणे.
मार्गिका संपण्याच्या ठिकाणी अपघातास कारणीभूत मातीच्या ढिगारे.
अरुंद रस्ता सुरू होण्याच्या पाचशे मीटर अंतरापासून धोक्याची सूचना देणारा कायमस्वरूपी सुचनाफलक नसणे.
भूसंपादन अपूर्ण त्यामुळे महामार्ग चारपदरी.
महामार्गावर वाहनांकडून वेग मर्यादेचे उल्लंघन
अरुंद रस्त्याबाबत कंत्राटदार कंपनीमार्फत
सुरक्षेच्या उपाययोजना नसणे.
गुजरात मार्गिकेवर अरुंद रस्त्याच्या ठिकाणी एक सिग्नल आणि स्टीलच्या पत्र्याचा तात्पुरता फलक,
वाहनाच्या धडकेत सिग्नलची दुर्दशा ‘जैसे थै’
मुंबई मार्गिकेवर तात्पुरता फलक. फलकाच्या सुरक्षेसाठी त्यामुळे वाहनांना अपघात
येथील अरुंद रस्त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. यात वाहनचालक, प्रवाशांचे नाहक बळी जात आहेत. रस्ते ठेकेदार कंपन्यांचा निष्काळजपणा यास कारणीभूत असून ठेकेदार कंपनीवर कारवाई करणे जरुरीचे आहे.
-शैलेश पाटील, नागरिक, पाटिल पाडा.
महामार्गावरील होणारे अपघाता पाहता येथील वाहनचालक आणि प्रवाश्यांना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनाबाबतची योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
– शशी भूषण,प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.