नाटय़ क्षेत्रातील सगळ्याच रंगकर्मीचे अहंकार टोकेरी असतात. चाकांच्या घडय़ाळासारखे मी त्यांना हाताळतो. घडय़ाळातील टोकेरी चाकांचे दाते जसे एकमेकांत अडकवलेले असतात आणि त्यायोगे त्यांची धार बोथट केली जाते; तसेच मी तीक्ष्ण अहंकारांच्या नाटय़कर्मीची परस्परांशी सांगड घालून त्यांचे टोकाचे अहंकार बोथट करतो. त्यातही काही चाके बोचतात. त्यांना त्यांच्या नकळत बोथट करावे लागते. त्यासाठी त्यांचे गैर वागणे विसरून जाऊन त्यांना क्षमाही करावी लागते, तरच नाटय़ चळवळ उभी राहू शकते. हेच काम मी ‘रंगायन’ ते ‘आविष्कार’ या ५० वर्षांच्या नाटय़प्रवासात अखंडपणे करीत आलेलो आहे, असे सांगत नाटय़ संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांनी आपल्या ‘अजातशत्रुत्वा’मागचे रहस्य विशद केले.
रविवारी  सकाळी गो. पु. देशपांडे रंगमंचावर त्यांची प्रकट मुलाखत आणि स्थानिक रंगकर्मीशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात अनेक टोकदार प्रश्नांना अरुण काकडे यांनी हसतखेळत उत्तरे दिली. झी मराठीचे दीपक राजाध्यक्ष, नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर आणि प्रवीण तरडे यांनी नाटय़ संमेलनाध्यक्षांना बोलते केले.
नाटय़ परिषदेच्या यशवंत नाटय़संकुलात प्रायोगिक आणि बालरंगभूमीसाठी छोटेखानी थिएटर उपलब्ध करून देण्यासाठी जे आंदोलन झाले होते, त्या संदर्भातील खुलासा करण्याच्या मिषाने नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी हा विषय मुद्दाम छेडला. ‘अरुण काकडे आज जी समन्वयाची भाषा करीत आहेत, तीच आमचीही त्या वेळी होती, परंतु आंदोलनकर्त्यांनी सभ्यता सोडली. त्यामुळे त्या घटनेला वेगळेच वळण मिळाले. यासंदर्भात काकडेकाकांनी खुलासा करावा.
मोहन जोशी यांच्या या आक्षेपाला सौम्यपणे, परंतु ठामपणे उत्तर देताना काकडे यांनी सांगितले की, ‘आम्ही आधी सामोपचाराच्या मार्गानेच जात होतो. परंतु त्यास नाटय़ परिषदेने दाद न दिल्याने दुसरा मार्गच न उरल्याने आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. त्यावेळच्या नैराश्यातून कदाचित आंदोलनात थोडासा अतिरेक झालाही असेल; पण त्यामागे वैफल्यग्रस्तता होती हे समजून घ्यायला हवे.’
‘आता आंदोलनकर्ते अरुण काकडेच नाटय़संमेलनाध्यक्ष झाल्याने आंदोलनाचे काय?’ असा प्रश्न विचारला गेला असता ‘आम्ही आता समन्वयाने हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे काही होईल ते मी पुढच्या वर्षी तुमच्यासमोर ठेवेनच,असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader