केंद्र सरकारने राज्यासाठी मंजूर केलेले इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट नागपुरातच होणार असल्याची घोषणा बुधवारी राज्याचे शिक्षण व उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केली. या घोषणेने गेले काही दिवस यासंदर्भात सुरू असणाऱ्या चर्चाना पूर्णविराम मिळणार आहे.
केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राकरिता इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट घोषित केले होते. हे आयआयएम सुरू करण्यासाठी नागपूरसह औरंगाबाद, पुणे तसेच इतर ठिकाणचे प्रस्ताव याकरिता राज्य शासनापुढे आले होते. त्यातही औरंगाबाद आणि नागपूर या दोन ठिकाणांमध्ये याबाबतची रस्सीखेच सुरू होती. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. मिहानमधील जागा आयआयएम सुरू करण्याकरिता देण्याचा प्रस्तावात समावेश होता. तसेच, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीने तात्पुरत्या इमारती तसेच सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान, राज्यात येणारे हे पहिले आयआयएम नेमके कुठे सुरू होणार याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात होते. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज संपता संपता आज राज्याचे शिक्षण व उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भातील घोषणा केली. नवे आयआयएम हे नागपुरातच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी वरिष्ठ सभागृहात जाहीर केले. राज्यातील इतर ठिकाणांचे यासंदर्भात प्रस्ताव होते. मात्र, निर्धारित मानांकन पध्दतीचा अभ्यास केल्यानंतर नागपूरलाच ही व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय, पुण्यात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्चर सुरू करण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
‘आयआयएम’ नागपुरातच : तावडे
केंद्र सरकारने राज्यासाठी मंजूर केलेले इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट नागपुरातच होणार असल्याची घोषणा बुधवारी राज्याचे शिक्षण व उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केली.
First published on: 25-12-2014 at 02:01 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iim will be set up in nagpur says vinod tawde