दापोली : तालुक्यातील नानटे गावातील नरेश मोहिते यांनी गुरांची अवैध वाहतुक होत असल्याचा संशयावरून संशयित गाडीचा पाठलाग करुन गाडी अडविली. दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गाडी व मुद्देमालासह गाडी चालकाला ताब्यात घेतले तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजता दापोली तालुक्यातील बौध्दवाडी – गावरई परिसरात हा प्रकार उघडकीस आला.
गुरांची अवैध वाहतुक होत असल्याचा संशय आल्यावरून नानटे गावातील नरेश मोहिते यांनी संशयित गाडीचा पाठलाग केला. चालकाला थांबवून हटकले असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. याची माहीती त्यांनी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून दाभोळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन टाटा इंट्रा ( एमएच ०३ डीव्ही ९३२६) या टेंपोसह चालकाला ताब्यात घेतले. यावेळी टेंपोत एक काळ्या रंगाचा बैल मिळून आला. या बाबत दाभोळ पोलीस स्थानकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील वळणे बौद्धवाडी येथील सुरेश गणपत मोहिते याने त्याचेकडील वीस हजार रूपये किंमतीचा चार वर्षे वयाचा काळ्या रंगाचा बैल अब्दुल रौफ माखजनकर (राहणार टेटवली, ता. दापोली जि. रत्नागिरी ) यास विकला. तो बैल अब्दुल रौफ माखजनकर याने टेम्पोमध्ये बैलास वेदना व हाल होतील अशा रितीने पुरेशी जागा नसताना सुद्धा आखुड दोरीने बांधून ठेवले. त्या बैलास कत्तल करण्याच्या इराद्याने वाहनातून घेऊन जात असताना नरेश नारायण मोहिते (वय ५०) यांनी हा बैल घेवून जात असलेले वाहन गावराई, ता. दापोली येथे पाठलाग करुन थांबविले. त्यावरून दाभोळ सागरी पोलीस ठाणे येथे प्राण्यांना निर्दयतेने वागविल्याने प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (घ) (ड.) (च) सह महाराष्ट प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चा (सुधारित सन २०१५) चे कलम ५.५ (अ), (ब), ९ प्राणी वाहतुक नियम १९७८ चे कलम ५८, महाराष्ट पोलीस कायदा कलम ११९, महा मोटार वाहन कायदा कलम ८३/१७७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मात्र हा टेम्पो सापडल्याने संशयितांवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा यासाठी दाभोळ सागरी पोलीस स्थानक परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी दाभोळ परिसरातील सुमारे चारशे ते पाचशे ग्रामस्थ पोलीस ठाण्याबाहेर उभे होते. बंदोस्तासाठी दापोली, गुहागर, मंडणगड, खेड तसेच रत्नागिरी मुख्यालयाचे असे एकूण साठ ते पासष्ठ पोलीस कर्मचारी तैनात असतांनाही रात्रीचे एक वाजता चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा…रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील धरणातून मुबलक पाणी साठा
या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली असून रात्री हा सगळा प्रकार त्यांना समजताच त्यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस पथक घटनास्थळी तैनात केले. याबाबतीत दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.