लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा : पाचगणी भोसे (ता महाबळेश्वर) येथे अवैध बांधकाम पाडण्याची मोहीम आज सकाळी सहा वाजल्यापासून महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आहे. त्यामुळे अवैध बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महाराष्ट्राचा मिनी काश्मीर महाबळेश्वर तालुक्यात पुन्हा अवैध बांधकाम आणि तोंड वर काढले होते. यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसीलदार खोचरे पाटील यांनी आज सकाळी सहा वाजताचा कारवाईचा बडगा उगारला आहे. भोसे या गावात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामाने तोंड वर काढले होते. या गावातील अनधिकृत बांधकामावर महाबळेश्वर प्रशासनाने आज सकाळपासूनच मोठ्या जेसीबी पोकलेन अनाधिकृत बांधकामावर नेहून थेट तोडण्यास सुरुवात केली आहे.
महाबळेश्वर महसूल विभागाचे शंभरहून अधिक कर्मचारी, पोलीस या मोहिमेत सहभागी झाले आहेत. भोसे येथील भलेमोठे तीन अनधिकृत बंगले पाडण्यात आले. आज सकाळी सहा वाजल्यापासून हे मोहीम सुरू झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यात अनेक धन दांडग्यांनी विनापरवाना अनधिकृत बांधकामे केली असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ही करण्यात आली आहे. सातारा जिल्हाधिकारी प्रांताधिकारी वाई यांनी महाबळेश्वर तहसीलदारांच्या माध्यमातून अनेकदा अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. तरीही बांधकामे वाढत आहेत.