महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत मंगळवारी माजी उपमहापौर अ‍ॅड. मनीष बस्ते यांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. मुरकुटे कॉलनीतील प्रियदर्शनी बंगल्यात सामासिक अंतरात व टेरेसच्या जागेत अ‍ॅड. बस्ते यांच्यासह इतरांनी केलेले बांधकाम पालिकेच्या पथकाने हटविले. सिंहस्थापासून शहरात अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम सुरू आहे. सुरुवातीला प्रमुख मार्गावरील अतिक्रमणे हटविली गेली. कुंभमेळ्याच्या तीन मुख्य पर्वण्या झाल्यानंतर थंडावलेली मोहीम गत काही दिवसांपासून वेग घेत आहे. त्यात अंतर्गत रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटविली जात आहे. सार्वजनिक जागा, खासगी जागेवरील बेकायदेशीर बांधकामे, वाहनतळाच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे काढून घेण्याचे आवाहन पालिकेने आधीच केले होते. ज्यांनी ही अतिक्रमणे काढून घेतली नाहीत, ती काढण्याचे काम सध्या सुरू आहे. मंगळवारी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने माजी उपमहापौर अ‍ॅड. बस्ते यांच्या निवासस्थानी धडक दिली. त्यांच्या बंगल्यात सामासिक अंतर व टेरेसच्या जागेत अनधिकृत बांधकाम केलेले आहे. पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईद्वारे राजकीय विरोधाला न जुमानता मोहीम सुरू असल्याचे अधोरेखित केले जात आहे. तथापि, कारवाई करताना काही विशिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अतिक्रमणांकडे डोळेझाक केली जात असल्याची तक्रार इतरांकडून होत आहे.

Story img Loader