तालुक्यातील नागापूरवाडीच्या मुळा नदीपात्रात महसूल व पोलिसांनी रविवारी केलेल्या संयुक्त कारवाईत बेकायदा वाळू उपसा करणारे एक पोकलेन, दोन जेसीबी तसेच दोन ट्रक्टर जप्त केले. याच महिन्यातील ही चौथी कारवाई होऊनही वाळूतस्कर मात्र मोकाट असून कारवाईचा केवळ फार्स होत असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, १५ एप्रिल रोजी प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक जगदीश मुलगिर यांनी केलेल्या कारवाईत यांत्रिक उपकरणे तसेच वाहनांचे क्रमांक माहीत नसल्याचे महसूल विभागाने नऊ दिवसानंतर दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले असले तरी या कारवाईची व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या हाती लागली आहे. या क्लिपमध्ये चालकांनी त्यांच्यासह यांत्रिक उपकरणांच्या मालकांची नावे उघड केली असून या क्लिपच्या अधारे तसेच मुलगिर व इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून वाळूतस्करांनी त्याच्या उपकरणे तसेच वाहनांसह जेरबंद करू असे पोलिस निरीक्षक शरद जांभळे यांनी सांगितले.
या कारवाईची व्हिडीओ क्लिप पोलिसांपर्यंत पोहचल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमधून प्रसिद्घ झाल्यानंतर महसूल यंत्रणा खडबडून जागी झाली. रविवारी सुटीचा दिवस असूनही सकाळीच पोलिस बंदोबस्त घेउन तहसिलदार डॉ. विनोद भांबरे यांनी विविध पथकांद्वारे नागापूरवाडीत छापा टाकला. तेथे एक पोकलेन दोन जेसीबी तसेच दोन ट्रॅक्टर वाळूचा उपसा करीत असल्याचे आढळून आले. पथके नदीपात्रात आल्याचे पाहून जेसीबी चालकांनी दोन्ही यंत्रे नदीपात्राबाहेर काढून, आम्ही उपसा करीत नसल्याचा कांगावा केला. परंतु पथकातील कर्मचाऱ्यांनी ती उपकरणे वाळू उपसा करीत असल्याचे रंगेहात पकडल्याने त्यांचा इलाज चालला नाही.  
दृश्यफितीची तालुक्यात जोरदार चर्चा
दरम्यान, मुलगीर यांनी केलेल्या कारवाईच्या व्हिडीओ क्लिपची तालुक्यात जोरदार चर्चा असून मंडलाधिकारी ए. ए. फुलमाळी यांनी वाळूतस्करांना पाठीशी घातल्याबददल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात फुलमाळी यांना विचारले असता त्यांनी, मला तहसिलदारांनी अशा प्रकारची फिर्याद देण्यास सांगितल्याचे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला. कारवाई करताना तुम्ही होते की तहसिलदार, असे विचारले असता आम्हाला बळजबरीने पाठविले होते, आम्हाला नावे माहीत असण्याचे काय कारण, असे ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांंपासून वाळूतस्करीविरोधी पथकात आग्रहाने काम करीत असताना तालुक्यातील वाळूतस्कारांची नावे तुम्हास कशी माहीत नाहीत, पोलिस पथकाने तुमच्याकडे दिलेली नावे कुठे आहेत असे विचारले असता फुलमाळी निरूत्तर झाले.  
१५ एप्रीलला महसूल कर्मचाऱ्यांनी उपकरणे व ट्रॅक्टर चालकांना तहसिल कार्यालयात आणल्यानंतर तथाकथीत समाजसेवकाने तेथे येउन त्यांना सोडवून नेले होते. समाजसेवकाची या तडजोडीची व्हिडीओ क्लिप तयार करण्यात आली असून तीही पोलिसांना तपासासाठी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तथाकथित समाजसेवक चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.