‘म्हाडा’च्या नाशिक विभागीय सभापतींचा कार्यकाळ संपुष्टात आला असतानाही शासनाच्या लाल दिव्याच्या गाडीचा तब्बल ५७ दिवस बेकायदेशीर वापर केल्याचे उघड झाले आहे. या कालावधीत संबंधित वाहनाचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची तक्रार धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील माहितीचा अधिकार कार्यकर्ते संग्राम पाटील यांनी केली असून शासनाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून राजीनामा घ्यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
म्हाडाचे विद्यमान सभापती किरण शिंदे यांच्या वाहनाबाबतची माहिती पाटील यांनी माहितीच्या अधिकारान्वये मिळविली आहे. म्हाडाच्या सभापतिपदावर शिंदे यांची एक सप्टेंबर २००६ रोजी निवड करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २००९ रोजी संपुष्टात आला. परंतु तरीही शासनाची लाल दिव्याची इंडिगो कार त्यांनी ५७ दिवस बेकायदेशीररीत्या वापरली, असे पाटील यांनी म्हटले आहे. माहितीच्या अधिकारान्वये त्यांनी शासकीय वाहनाचा बेकायदेशीरपणे वापर केल्याचे स्पष्ट होऊनही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना हे पद पुन्हा बहाल केले. या शासकीय वाहनाचा २७ ऑक्टोबर २००९ रोजी गंभीर स्वरूपाचा अपघात झाला होता. त्यात एका व्यक्तीला प्राण गमवावे लागले. या प्रकाराबाबत शासनाला कळवूनही शिंदे यांची म्हाडाच्या सभापतिपदी पुन्हा निवड करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे, शासनाच्या विधी व न्याय विभागाने शिंदे यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने सभापतिपद देणे शक्य होणार नसल्याचा अभिप्राय संबंधित विभागांना देऊनही उपमुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे नियुक्ती देण्यात आली. ५७ दिवस लाल दिव्याच्या गाडीचा बेकायदेशीर वापर केल्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा