अलिबाग – गेल्या दीड महिन्यात विवीध विभागातील कर्मचाऱ्यांच्या कारनाम्यांमुळे रायगड जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणांची प्रतिमा मलिन झाली आहे. भ्रष्टाचार, अपहार आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायामुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेतन फरकाची रक्कम दाखवून जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ लिपीकाने पाणी पुरवठा विभाग आणि एकात्मिक बाल विकास विभागात पाच कोटींहून अधिक रकमेचा अपहार केल्याची धक्कादायक बाब समोर आली. सलग पाच वर्ष काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा अपहार सुरू होता. जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागाला आणि ऑडीट करणाऱ्यांना याची भनकही लागली नाही. वेतन फरकाच्या नावाखाली करोडो रुपयांची रक्कम अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या मारून परस्पर आपल्या आणि आपल्या कुटूंबियांच्या तसेच सहकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात रितसर वळवली जात होती. यामुळे रायगड जिल्हा परीषदेच्या कारभारावरच प्रश्न निर्माण झाले. खातेनिहाय चौकशी नंतर अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहार झालेली रक्कम वसूल करण्याचे काम सध्या सुरू आहे.

स्वस्त दरात सोने देतो सांगून नागपूर आणि कामोठे येथील सराफांना १ कोटी ५० लाखांना लुटल्याचे एक प्रकरण समोर आले. या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणातील पाच पैकी तीन कर्मचारी पोलीस असल्याची बाब समोर आली. समाधान पिंजारी, दीप गायकवाड, पोलीस अमंलदार समीर परशुराम म्हात्रे, विकी साबळे यांना स्थानिक गुन्हे शाखेनी अटक केली असून, या प्रकरणातील पाचवा आरोपी असलेला पोलीस साथीदार सुर्यवंशी सध्या फरार आहे. या दरोडा प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे रायगड पोलीसांची विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

पनवेल येथील न्यायालयात बोगस वारस दाखल्यांचे एक प्रकरण समोर आले. न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी वकीलांना हाताशी धरून बोगस वारस दाखल्यांचे वाटप केल्याचे निष्पन्न झाले. महत्वाची बाब म्हणजे न्यायाधीश आणि सहाय्यक अधिक्षकांच्या बोगस सह्या करून या वारस दाखल्यांचे वितरण सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, पाच वकीलांसह दोन न्यायालयातील कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयीन शुल्काच्या रक्केमतही कर्मचारी दिपक फड याने ६६ लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब समोर आली आहे. यात आणखिनही काही कार्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या या कृतीमुळे पनवेलच्या न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलीन झाली आहे.

पोलादपूर तालुक्याचे तहसीलदार लाचखोरीच्या प्रकरणात अडकले आहेत. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तहसीलदार कपील घोरपडे यांनी पोलादपूर तालुक्यातील मौजे पार्टे कोंड गावातील जमिनीच्या तफावती बाबत दावा तहसिलदार यांच्यासमोर दाखल करण्यात आला होता. या न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाचा निकाल देण्यासाठी तसेच आदेशाची प्रत तक्रारदार यांना देण्यासाठी घोरपडे यांनी ३ लाखांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर त्यांनी अडीच लाखांची लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. मात्र घोरपडे यांना संदर्भात संशय आल्याने त्यांनी ही रक्कम स्विकारली नाही. पण लाच मागीतल्याची खात्री पटल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा परिषद, पोलीस, महसूल आणि पनवेल येथील न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या या प्रकरणामुळे जिल्ह्यातील प्रशासनाची प्रतीमा मलिन झाली आहे. त्यामुळे भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली जात आहे.