राज्यात दलित अत्याचारांच्या घटनांत वाढ झाली असल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन त्याचा आढावा घ्यावा व दलितांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या तक्रारअर्जाच्या चौकशीसाठी स्वतंत्र पोलीस फोर्स तयार करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी आज, रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.
खडकत (ता. आष्टी) येथे अल्पवयीन दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेसंदर्भात भेट देण्यासाठी जात असताना खा. आठवले नगरमध्ये थांबले होते, त्या वेळी त्यांनी सरकारी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाचे पदाधिकारी श्रीकांत भालेराव, अशोक गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, विजय वाकचौरे, अजय साळवे आदी उपस्थित होते.
जवखेडे हत्याकांडाच्या गुन्हय़ातील अॅट्रॉसिटीचे कलम वगळण्यास आठवले यांनी जोरदार विरोध केला. पोलिसांची ही कृती अत्यंत घाईची आहे. केवळ जातीय शिवीगाळ केल्याचे कलम वगळले जात असल्याचे सांगून पोलीस लोकांची दिशाभूल करत आहेत, यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जवखेडे हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यास आता केवळ १० दिवसांचा अवधी स्थानिक पोलिसांकडे असल्याचे स्पष्ट करून आठवले म्हणाले, की दलितांवरील अत्याचारात वाढ झाल्याने राज्य सरकारने गावोगाव प्रबोधन करण्यासाठी समित्या स्थापन करण्याची आवश्यकता आहे. अन्याय, अत्याचार होत असल्याच्या तक्रारी दलित करतात, परंतु पोलीस त्याची दखल घेत नाहीत, त्यामुळे दलित अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र फोर्स तयार करावा, त्याचे नियंत्रण अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे द्यावे, स्वतंत्र उपअधीक्षक व संख्याबळ उपलब्ध करावे, त्याचबरोबर दलितांना स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यावेत, अशी आमची मागणी आहे.
जवखेडे हत्याकांडाच्या तपासाची परिस्थिती डॉ. दाभोलकर हत्येसारखी करू नये असा इशाराही आठवले यांनी दिला.
गृहमंत्रिपद आरपीआयला द्यावे
राज्यातील सरकारला राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा हा दुबळा आहे. स्थिर सरकारसाठी भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपली ताठर भूमिका सोडून एकत्र यावे, त्यामुळे दोन्ही पक्षांची प्रतिमा उजळेल, असे आवाहन खा. रामदास आठवले यांनी केले. दोघांनी एकत्र यावे यासाठी आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत. दोन्ही पक्षांत गृहमंत्रिपदावरून वाद असेल तर हे पद आरपीआयला द्यावे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद देण्यात भाजप टाळत आहे, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात किमान दोन मंत्रिपदे मिळावीत अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. एमआयएम पक्षाला हिंदुधर्मीयांशी दुश्मनी करून सत्ता मिळवता येणार नाही, त्यांना आपली भूमिका ‘सॉफ्ट’ करावी लागेल, असेही आठवले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.