पंढरपूर नगरपालिकेसाठी शासनाकडून जाहीर करूनही थकलेल्या यात्रा अनुदानाबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये बुधवारी प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत हा निधी तातडीने जमा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यानंतर लगोलग हा निधी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा झाल्याची माहिती पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंढरपुरात भरणाऱ्या मुख्य यात्रांसाठी म्हणून पंढरपूर नगरपालिकेस राज्य शासनाकडून ५ कोटींचे अनुदान दिले जाते. यंदाही अशा प्रकारच्या अनुदानाचा प्रतीकात्मक धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी यात्रेवेळी नगराध्यक्षांकडे सुपूर्द केला होता. मात्र या धनादेशातील रक्कम पुढे चार महिने झाले तरी पालिकेकडे जमा झालेली नव्हती. याबाबत नगरपालिकेच्या वतीने पाठपुरावा करूनही ही मदत पालिकेच्या तिजोरीपासून दूर राहिली होती. ठाकरे सरकारशिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातही जाहीर झालेले अनुदान पालिकेला जमा न झाल्याचे पुढे आले होते. या सरकारी अनास्थेबद्दलचे वृत्त बुधवारच्या (२५ नोव्हेंबर) ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच शासन दरबारी एकच खळबळ उडाली. उद्या कार्तिकी यात्रेनिमित्त शासकीय महापूजेसाठी पंढरीत येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या वृत्ताची दखल घेत हा निधी तातडीने जमा करण्याचे आदेश दिले. यासाठीचा शासन निर्णय आजच्या आज करण्यात येऊन हा निधी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला.

भाविकांविना आज कार्तिक वारी!

पंढरपूर : ज्या नगरीत टाळ मृदुंग आणि हरिनामाचा जयघोष आणि भक्तांची मांदियाळी पाहिली, त्या पंढरी नगरीत आषाढी वारी पाठोपाठ आता कार्तिक वारीत देखील नीरव शांतता पाहायला मिळत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने यंदा कार्तिक वारीवर देखील निर्बंध घातल्यामुळे यंदा प्रथमच यात्रेत वारक ऱ्यांऐवजी पोलिसांचीच गर्दी पाहण्यास मिळत आहे. दरम्यान, कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. दरवर्षी शासकीय महापूजेच्या वेळेस मंदिरात दाखल होणाऱ्या दर्शन रांगेतील भाविकाला महापूजेचा मान मिळत असतो. यंदा वारीच नसल्याने या महापूजेसाठी मंदिरातील सहा वीणेकऱ्यांमधून चिठ्ठीद्वारे कवडूजी भोयर आणि त्यांच्या पत्नींची निवड करण्यात आली आहे.

बद्रीनाथ तनपुरे यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार

राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१९-२०चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना बुधवारी मंत्रालय येथे घोषित करण्यात आला. कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी या पुरस्काराची घोषणा केली. संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पाच लाख रुपये, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.