अन्य पक्षांमधून ऐनवेळी भाजपमध्ये आलेल्या व उमेदवारी मिळविणाऱ्यांना मराठवाडय़ातील मतदारांनी नाकारल्याचेच चित्र दिसून येत आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तीसाठी थेट पंतप्रधानांनी सभा घेऊन निवडून देण्याचे आवाहन केले. मात्र, त्याचा या उमेदवारांना फारसा उपयोग झाला नाही. यातील काही उमेदवार प्रत्यक्षात चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.
पैठणमध्ये विनायक हिवाळे यांना उमेदवारी दिली होती. ते शिवसेनेतून अचानक आले. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची २९ हजार ९५७ मते मिळाली. कन्नडमध्ये संजय गव्हाणे यांचीही अवस्था तशीच होती. तेही तिसऱ्या क्रमांकावर राहिले. औरंगाबाद मध्यमधून रात्रीतून उमेदवारी मिळविणाऱ्या किशनचंद तनवाणी यांनाही मतदारांनी नाकारले. त्यांच्याविषयी शिवसेनेत कमालीची नाराजी आहे. त्यांना मिळालेली मते शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली असती आणि एमआयएम या पक्षाला मराठवाडय़ात प्रवेश करता आला नसता, असे आता सांगितले जात आहे.
घनसावंगीत विलास खरात, अरविंद चव्हाण, परभणीत आनंद भरोसे या बरोबरच नांदेडमध्येही बाहेरून आलेल्या बहुतांश उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. नांदेड दक्षिणमधून दिलीप कंदकुर्ते, सुधाकर पांढरे, राजेश पवार, अशोक सूर्यवंशी, माधवराव किन्हाळकर, अॅड. शिवाजी जाधव यांनाही मतदारांनी नाकारले. निवडणुकांपूर्वी केवळ उमेदवारी मिळावी, या हेतूने भाजपमध्ये प्रवेश मिळवून मैदानात उतरलेल्या अनेकांना मतदारांनी साफ नाकारले. पूर्वी भाजपमध्ये काम करणाऱ्या, मात्र काही काळ दूर गेलेल्यांना स्वीकारल्याची दोन उदाहरणे भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यात महेश फड व प्रशांत बंब यांची नावे दिली जातात. पक्षात काम करणाऱ्या अन्य कोणालाही उमेदवारी दिली असती, तरी मोदींच्या प्रभावाखाली उमेदवार विजयी झालेच असते, असाही दावा केला जात आहे.
बाहेरून आलेल्या या उमेदवारांना का नाकारले गेले असावे, याची कारणमीमांसा भाजपचे मराठवाडा प्रवक्ते श्रीकांत जोशी यांनी केली. ‘हे खरे आहे की बाहेरून आलेल्या काहींना दिलेल्या उमेदवारीचा फटका तसा भाजपला बसलाच. अन्यथा २० ते २२ जागांवर उमेदवार निवडून आले असते. मुळात पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना लोक ओळखतात, असा या निकालाचा अर्थ संघटनेच्या पातळीवर घेतला जात आहे’ असे जोशी यांनी सांगितले.

Story img Loader